वैभववाडी तालुक्यातून संदेश पारकरांना मताधिक्य मिळेल
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातून शिवसेना संपली असे सांगणाऱ्यांना आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे प्रवेश घेण्याची वेळ का आली आहे? असा सवाल करीत आमचे कार्यकर्ते पदाधिकारी पैशाचे आमिष देऊन फोडलात तरी आमच्यावर परिणाम होणार नाही. वैभववाडी तालुक्यात महाविकास आघाडीचे उमदेवार संदेश पारकर यांनाच मताधिक्य मिळेल.असा विश्वास शिवसेना नेते सतीश सावंत यांनी व्यक्त केला आहे. वैभववाडी येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सावंत बोलत होते. यावेळी उबाठा सेनेचे उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, स्वप्नील धुरी, लक्ष्मण रावराणे, गुलझार काझी, भीमराव भोसले, अनिल कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना सावंत यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली. ज्या कार्यकर्त्यांचा प्रवेश घेत आहेत. ते कार्यकर्ते राणे यांच्या कार्य कर्तृत्वार भाराहून प्रवेश करीत आहेत, असे नाही तर कमिशन मधून मिळालेल्या पैशातून पैसे देऊन प्रवेश घेतले जात आहेत. ज्या कार्यकर्त्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत पैसे घेतले त्यांचेच प्रवेश होत आहेत. कितीही पैसे देऊन प्रवेश घेतले तरी लोकसभेच्या वेळीचे चित्र दिसणार नाही. तालुक्यातून आम्हालाच मताधिक्य मिळणार असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. येथील जनता आमदार नितेश राणेना कंटाळली आहे. वैभववाडी तालुका व जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेला करूळ घाट गेले 10 महिने बंद आहे. भुईबावडा घाटाची व वैभववाडी उंबर्डे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. ठेकेदार म्हणतात आमचा नाईलाज आहे. आम्हाला कमिशन द्यावे लागते. त्यामुळे या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.याला आमदार राणे जबाबदार आहेत. याबाबत वैभववाडीतील व्यापाऱ्यांनी आमदार राणे यांना हा घाट कधी सुरु करणार असा जाब विचारला. करूळ घाट बंद असल्यामुळे वैभववाडी बाजारपेठ ओस पडत चालली आहे. या मार्गांवरील हॉटेल, व्यापारी धंदा बंद असल्यामुळे त्यांच्यावर रस्त्यावर यायची वेळ आली आहे. मात्र याचे त्यांना सोयारसुतक नाही. घाटाचे ठेकेदार व आमदार राणे यांची मिलिभगत असल्यामुळेच घाट बंद ठेवण्याची वेळ आली आहे. असा आरोप सावंत यांनी केला आहे. घाट सुरु करण्यासाठी वैभववाडी शिवसेनेच्यावतीने ढोल बजाव आंदोलन करून निद्रिस्त प्रशासनाला जागे करण्याचे काम केले आहे. त्यांनी 11 नोव्हेंबर पासून घाटातून एकेरी वाहतूक सुरु करण्याचे आश्वसन दिले आहे. जर वाहतूक सुरु झाली नाही तर त्याला आमदार जबाबदार राहतील. त्यांनी फक्त विकासाच्या वल्गना करू नये. चालू असलेली विकास कामे ठप्प करण्याचे काम केले आहे. खा. नारायण राणे निवडून येऊन सहा महिने झाले. हा विषय त्यांच्या अखत्यारीत असूनही त्यांनी काही केलेले नाही. त्यामुळे वैभववाडीतील जनता, व्यापारी, शेतकरी यांना त्यांनी याचे उत्तर देणे गरजेचे आहे. मगच जनतेकडे मत मागण्यासाठी फिरावे. असा सल्ला सावंत यांनी दिला आहे. महाविकास आघाडीकडून घराणेशाहीच्या विरोधात एक सर्वसामान्य, संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व अशी संदेश पारकर यांची ओळख आहे. तर आमदार राणे यांचा घराणेशाहीतुन उदय झाला आहे व खा. नारायण राणे यांचे पुत्र या पलीकडे त्यांची ओळख काय? असा सवाल सावंत यांनी केला आहे. तुम्ही कितीही पैसे वाटा कार्यकर्ते फोडा मात्र यावेळी पारकरच विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चौकट आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी ते उंबर्डे रस्त्यावरून 50 च्या वेगाने एकदा गाडी चालवून दाखवावी. असे आमचे त्यांना आवाहन असल्याचे सावंत यांनी सांगितले.रस्त्याच्या दुरावस्थेवरून हे आवाहन केले आहे.