वैभववाडी (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ वैभववाडी यांच्यावतीने शुक्रवारी मध्यरात्री अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे वैभववाडी तालुक्यातील सर्व गावातुन आंबेडकरी अनुयायांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन वैभववाडी येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला वैभववाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल व सरचिटणीस रवींद्र पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बौद्ध उपासक संतोष कदम सुरेंद्र पेडणेकर यांनी सामुदायिक त्रिसरण पंचशील घेतले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नवोदित गायिका प्रिया कांबळे, शरद कांबळे, सचिन कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीत सादर करीत सर्वांची मने जिंकली. त्यांना पिंट्या कांबळे व अविष्कार कांबळे यांनी वाद्याची साथ दिली.
यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्ष शारदा कांबळे, सचिव रुचिता कदम, प्रा.रमेश गुलदे, जयवंत मोरे, प्रफुल्ल जाधव, प्रा. राहुल जाधव, ऋचा पवार, विलास जाधव, उदय जाधव, गंगाराम कांबळे, सचिन जाधव यांच्यासह तालुका संघाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.त्याचप्रमाणे वैभववाडी तालुक्यातील सर्व गावातील बौद्ध मंडळांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मध्यरात्री मशाल रॅली व भीम गीत गायनाने अभिवादन करण्यात आले.












