देवगड कणकवली वैभववाडी तालुक्यातील 20 किमी लांबीच्या आणखी 6 रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात मंजूरी
कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात कणकवली देवगड वैभववाडी तालुक्यातील आणखी 20 किमी लांबीच्या 6 रस्त्यांना मंजुरी मिळवली आहे. भाजपा शिवसेना युती सरकार सत्तेत येताच आमदार नितेश राणे यांनी आपल्या कणकवली देवगड वैभववाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासगंगा आणायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ( संशोधन विकास ) अंतर्गत आपल्या मतदारसंघातील 20 किमी लांबीच्या आणखी 6 रस्त्यांना मंजुरी मिळविली आहे. रा.मा.181 ते भिरवंडे मंदिर 5 किमी, कलमठ मुस्लिमवाडी रस्ता दीड किमी., प्रजीमा 4 ते मुणगे आचरा पार रस्ता साडेतीन किमी, प्रजिमा 10 मळेगाव अनभवणेवाडी रस्ता 2 किमी,एडगाव तांबेवाडी रस्ता साडेतीन किमी, भूईबावडा ऐणारी रस्ता 5 किमी या रस्त्यांना 13 मार्च रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ही कामे मंजूर होण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विशेष बाब म्हणून शिफारस केली होती. या रस्त्यांमुळे दळणवळणाची चांगली सुविधा निर्माण होणार असल्यामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.