मालवण (प्रतिनिधी) : किल्ले सिंधुदुर्ग दर्शनास आलेल्या सातारा येथील काही महिला पर्यटकांनी कर वसुली करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या महिला कामगारांना मारहाण केल्याची घटना आज घडली. त्यानंतर त्या पर्यटकांना जेटी येथे आणत स्थानिक महिलांनीही यथेच्छ चोप दिला. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले. अखेर दोन्ही गटात झालेल्या चर्चेअंती रॉकगार्डन परिसरात सातारा येथील त्या महिलांनी महिला कामगारांची माफी मागितल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. येथील किल्ले सिंधुदुर्ग दर्शनास सातारा येथील महिला व पुरुष असा समूह गेला होता. किल्ल्यावर वायरी भुतनाथ ग्रामपंचायतीच्या वतीने पर्यटकांकडून कर आकारणी केली जाते. सातारा येथील या पर्यटकांकडे कराची मागणी केली असता त्यांनी तो देण्यास नकार दिला. किल्ला पाहून झाल्यानंतर या महिला पर्यटक पुन्हा कर वसुलीच्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी वसुली करणाऱ्या महिला कामगारांशी हुज्जत घालत मारहाण केली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकाराची माहिती महिला कामगारांनी सरपंच, ग्रामसेवक यांना दिली. त्यानंतर सातारा येथील पर्यटकांना बंदर जेटी येथे बोलावून घेत विचारणा केली असता त्यांनी पुन्हा हुज्जत घालण्यास सुरवात केली. महिला कामगारांना मारहाण केल्याने संतप्त बनलेल्या स्थानिक महिलांनीही सातारा येथील महिला पर्यटकांना यथेच्छ चोप दिला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले.
ग्रामपंचायतीच्या महिला कामगारांना मारहाण झाल्याची माहिती मिळताच येथील पोलीस ठाण्यात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी, ग्रामपंचायत सदस्य, महिलांनी धाव घेत पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्याशी चर्चा केली.
पर्यटकांकडून ग्रामपंचायत कामगारांना झालेल्या मारहाण प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पोलिसांनी संबंधित पर्यटकांना बोलावून घेत चौकशी केली. त्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी संबंधित पर्यटकांनी कामगारांची माफी मागावी अशी मागणी केली. दोन्ही गटात झालेल्या चर्चेअंती रॉकगार्डन परिसरात सातारा येथील त्या महिला पर्यटकांनी महिला कामगारांची माफी मागितल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.