पिग्मी एजंट सायली घाडी यांच्यावरील अन्यायाविरोधात संचालक सुशांत नाईक यांचे लाक्षणिक उपोषणास सुरू

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग बँकेच्या मोंड शाखेच्या पिग्मी एजंट सायली घाडी यांना बँकेच्या पिग्मी एजंट कामातून कमी करण्यात आले आहे. याविरोधात जिल्हा बँकेच्या ओरोस येथील प्रधान कार्यालयासमोर जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांनी आज लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. यावेळी युवा सेना कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके, देवगड युवा सेना तालुकाप्रमुख फरीद काझी आदी उपस्थित आहेत. सायली घाडी मागील 24 वर्षे पिग्मी एजंट म्हणून कार्यरत आहेत. दरमहा 3 लाखांची उलाढाल त्या करतात. मात्र सायली घाडी ह्या ठाकरे शिवसेना पक्षाचे काम करतात या रागाने आकसापोटी बँकेकडून घाडी याना कामावरून कमी केले आहे. याबाबत आम्ही जिल्हा बँकेचे सीईओ प्रमोद गावडे याना जाब विचारणार आहोत. सायली घाडी यांनी पिग्मी एजंट म्हणून जिल्हा बँकेच्या हितासाठी ठेवी गोळा केल्या आहेत.राजकीय आकसापोटी घाडी याना कामावरून कमी करण्यात आले आहे. मागील 24 वर्षे प्रामाणिकपणे पिग्मी एजंट म्हणून काम करणाऱ्या घाडी यांनी बँकेचे हितच जोपासले. त्यामुळे याविरोधात जिल्हा बँक संचालक म्हणून सोमवार 16 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ओरोस येथील प्रधान कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण छेडणार असल्याचे जिल्हा बँक संचालक तथा युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सहकार महर्षी शिवरामभाऊ जाधव यांनी जिल्हा बँकेचे रोपटे लावले. त्यांनी कधीच आकसाने कारवाई केली नाही. मात्र जिल्हा बँकेचे तज्ञ संचालक आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार सायली घाडी याना पिग्मी एजंट कामावरून कमी केल्याचा आरोप सुशांत नाईक यांनी केला. एकीकडे लाडक्या बहिणींना राज्य सरकार दरमहा रक्कम देत असताना सिंधुदुर्गात मात्र आमदार नितेश राणे हे राजकीय आकसाने जिल्हा बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई करत आहेत.जिल्हा बँक पिग्मी एजंटकडून करारनामा करून घेत असते. त्या करारनाम्यात पिग्मी एजंट ने राजकीय पक्षाचे काम करू नये असा उल्लेख नाही आहे. त्यामुळे आयत्या वेळच्या विषयांत आमदार नितेश राणेंच्या सूचनेवरून ठाकरे सेनेचे पक्षीय काम करतात म्हणून जिल्हा बँकेच्या पिग्मी एजंट पदावरून कमी करणे हे चुकीचे आहे. हा चुकीचा पायंडा जिल्हा बँकेत पडत आहे. याविरोधात आम्ही लाक्षणिक उपोषण छेडत असल्याचे नाईक म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!