जि.प.समाेर आंबोली जकातवाडी येथील शिवाजी चव्हाण यांचे लाक्षणिक उपोषण
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : प्रॉपर्टी कार्डच्या नकाशात झालेला बदल तसेच चौकशी नोंदवहीच्या उताऱ्यात झालेल्या अक्षर बदल आणि खाडाखोड याबाबत माहिती अधिकारात अर्ज करूनही उपअधीक्षक भूमी अभिलेख सावंतवाडी यांच्या कार्यालयाकडून माहिती दिलेली नाही. या कार्यालयाकडून असहकाराची भूमिका घेतली जात आहे. या विरोधात आज शिवाजी गोविंद चव्हाण यांनी जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.
सावंतवाडी तालुक्यातील आंबोली, जकातवाडी येथील शिवाजी चव्हाण यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख सावंतवाडी यांच्या असहकाराच्या विरोधात जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे. याबाबत त्यांनी अधीक्षक भूमी अभिलेख सिंधुदुर्ग यांना निवेदन सादर केले आहे.या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, उपअधीक्षक भूमी अभिलेख सावंतवाडी यांच्या कार्यालयात माहिती अधिकारात अर्ज करून तसेच वारंवार विनंती करूनही प्रॉपर्टी कार्डच्या नकाशात झालेल्या बदलाबाबत व चौकशी नोंदवहीच्या उताऱ्यात झालेला अक्षर बदलाबाबत तसेच खाडाखोडीबाबत मागणीप्रमाणे कोणतीही माहिती दिलेली नाही.कायम असहकराचे धोरण अवलंबलेले आहे. सन १९९८ मध्ये आंबोली सिटी सर्वे नंबर ८६, ८७, ८८ व ८९ मध्ये माझे वडील गोविंद विष्णू चव्हाण यांचे नाव होते. मात्र सन २००२ मध्ये नकाशात व चौकशी नोंदवहीच्या उताऱ्यात खाडाखोड करून बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे माझ्या जमिनीत अतिक्रमण होऊन माझे अतोनात नुकसान झालेले आहे. मला नाहक शारीरिक मानसिक व आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. तरी माझ्या मागणीप्रमाणे माझ्या प्रॉपर्टी कार्डच्या नकाशात झालेल्या बदलाबाबत व नोंदवहीच्या उताऱ्यात झालेला अक्षर बदलाबाबत व खाडाखोडीबाबत तात्काळ माहिती उपलब्ध करून द्यावी. या मागणीसाठी शिवाजी गोविंद चव्हाण यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे.