इमारतमालक अनिल डेगवेकर यांनी छेडले बेमुदत उपोषण
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कणकवली येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह इमारतीचे २ वर्षे ९ महिन्याचे तब्बल ३४ लाख २३ हजार ८९४ रुपयांचे भाडे शासनाकडून थकीत आहे. गेली ३४ महिने भाडे न मिळाल्याने इमारतीचे मालक अनिल डेगवेकर आर्थिक अडचणीत सापडले असून ही थकीत रक्कम त्वरित मिळावी. यासाठी डेगवेकर यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेुदत उपोषण सुरू केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह कणकवली हे भाड्याची इमारतीत आहे. ही इमारत अनिल डेगवेकर यांच्या मालकीची असून शासनाकडून या इमारतीचे भाडे त्यांना दिले जाते. मात्र १ जुलै २०१९ ते ३१ मार्च २०२२ या ३४ महिन्याचे तब्बल ३४ लाख २३ हजार ८९४ रुपयांचे भाडे अद्यापही इमारत मालकांना मिळालेले नाही. याबाबत इमारत मालक यांनी सहाय्यक आयुक्त समाकल्याण सिंधुदुर्ग यांचेही लक्ष वेधले होते. तसेच पालकमंत्री यांचेही लक्ष वेधले होते मात्र अद्यापही त्यांना भाडे मिळालेले नाही. त्यामुळे अखेर अनिक डेगवेकर यांनी आपल्याला शासनाकडून थकीत असलेले भाडे मिळावे यासाठी आज पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. दरम्यान नगरसेवक सुशांत नाईक, कणकवली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप मांजरेकर, पंढरीनाथ पांगम, अजय मोर्ये, प्रविण वरुणकर निलेश मालंडकर, आदीनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
संबंधितांवर दिरंगाई ची कारवाही व्हावी ; डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह कणकवली चा सन २०२२-२३ चा भाडे मागणी प्रस्ताव सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांनी अद्यापही वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला नाही. हा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात विलंब का होत आहे याची चौकशी व्हावी. आणि संबंधितावर दप्तर दिरंगाई ची कारवाई करण्यात यावी अशीही मागणी अनिल डेगवेकर यांनी केली आहे.