कणकवली (प्रतिनिधी) : जमीन जागेवरील वादातून चुलत भावावर कोयत्याने हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी फोंडाघाट येथील श्रीकृष्ण उर्फ भाई दामोदर तावडे (६२) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळ फोंडाघाट व सध्या मुंबई-बोरीवली येथे राहणारे दीपक यशवंत तावडे (५८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते फोंडाघाट येथे घर बांधत आहेत. ते बांधत असलेल्या घराबाबत त्यांच्याच भावबंधांपैकी भानुदास यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली होती. त्यानंतर ग्रामपंचायतीने अनधिकृत ठरवून घर बांधण्यास थांबविण्यास सांगितले होते. मात्र, दीपक हे घर बांधत असताना भानुदास यांचा बंधू श्रीकृष्ण तावडे तेथे गेला व त्याने दीपक यांना ‘तुम्ही येथे घर का बांधत आहात? परवानगी आहे का?’ असे विचारत दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी श्रीकृष्ण याने आकडीचा कोयता काढून फिर्यादी दीपक यांच्या डाव्या गालावर, डाव्या कानाला लागून मारला. यात त्यांना दुखापत झाली. दीपक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार श्रीकृष्ण याच्याविरोधात बीएनएस ११८(१), ३५२, ३५१(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, श्रीकृष्ण उर्फ भाई तावडे यांनीही पोलिसांत फिर्याद दिली असून त्यांच्या तक्रारीनुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार यु. डी. वंजारे करत आहेत.