वक्फ बोर्डाने दावा केलेले सिंधुदुर्गातील तपशील जाहीर करा: बंदर विकास मंत्र्यांची ही स्टंटगिरीच !! सिंधुदुर्ग काँग्रेसने दिले आव्हान !!!

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : वक्फ बोर्डाने सिंधुदुर्ग मधील देवस्थानांच्या जमिनीवर दावा केल्याचे कणकवलीचे आमदार आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे .वक्फ बोर्डाने सिंधुदुर्ग मधील जमिनीवर अथवा देवस्थाना वर दावा केला हे खरे असेल तर दहा वर्षे सत्तेवर असलेल्या नितेश राणे यांच्या हिंदुत्ववादी सरकारचे अपयश नाही काय ? असा सवाल काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी बांधकाम सभापती नागेश मोरये यांनी केला आहे.

एका निवेदनाद्वारे आपली भूमिका स्पष्ट करताना नागेश मोरये यांनी म्हटले आहे, “की वक्फ बोर्डाने सिंधुदुर्ग मधील जमिनीवर दावा केलेले तपशील नितेश राणे यांनी जाहीर करावेत .या संदर्भातला एक तरी योग्य पुरावा जनतेसमोर ठेवावा” असे आव्हान देत नागेश मोरये म्हणाले आहेत की,” गेली 55 /56 वर्षे केंद्रात काँग्रेसचे सरकार होते आणि महाराष्ट्रात सुद्धा अनेक वर्षे काँग्रेसचे सरकार होते. त्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्याही हिंदू देवस्थानावर किंवा हिंदू देवस्थानाच्या जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केल्याचे ऐकिवात नाही. आता नितेश राणे यांचे हिंदुत्ववादी म्हणविणारे सरकार गेली दहा वर्षे केंद्रात सत्तेवर आहे आणि महाराष्ट्रातही आहे. असे असताना जर वक्फ बोर्डाने हिंदू देवस्थान किंवा त्यांच्या जमिनीवर हक्क सांगितला असेल तर ते तुमच्या हिंदुत्ववादी सरकारचेच अपयश नाही काय ?सिंधुदुर्गातील हिंदू मुसलमान बांधवात हा अनेक शतके बंधूभाव असून सुखाने नांदत आहे राजकारणासाठी त्यात विष कालवू नका असे आवाहन नागेश मोरये यांनी केले आहे.

नागेश मोरये यांनी पुढे म्हटले आहे की,” नितेश राणे यांच्या म्हणण्याप्रमाणे खरोखरच अशा गोष्टी घडल्या असतील तर मग या सरकारनं आणि त्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राणे यांना सत्तेमध्ये राहण्याचा अधिकार नाही. वक्फ बोर्ड म्हणजे मुस्लिम देवस्थानाची कमिटी की ज्यावर सरकारचे नियंत्रण असते. मग असे असताना वक्फ बोर्डाकडून जर असे सिंधुदुर्गात घडले असेल तर त्याची जबाबदारी नितेश राणे आणि ते सध्या ज्या पक्षात आहेत त्या हिंदुत्ववादी सरकारचीच नाही काय ?”


“एखाद्या मंत्र्याने स्टंटगिरी करणे म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. वक्फ बोर्डाचा नसता बागुलबुवा उभा करून लोकांचे खरे प्रश्न, सिंधुदुर्गातील व्हेंटिलेटर वर असलेली आरोग्य यंत्रणा, इथली बेरोजगारी, इथल्या शाळांमधील शिक्षकांची वानवा, शेतकरी, बागायतदार, मच्छीमार यांचे खरे प्रश्न अशा जिल्हा विकासाशी निगडित असलेल्या गंभीर प्रश्नांवर नितेश राणे यांचे अपयश झाकून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा हा प्रयत्न आहे. काँग्रेसमध्ये असताना शरद पोंक्षेच्या नाटकावर हल्ला, राम गणेश गडकरी यांच्या प्रतिमेची विटंबना, बांगडा फेक, चिखल फेक सारखे स्टंट करताना आपले राजकीय बाटगे पण दडविण्यासाठी सिंधुदुर्गातील हिंदू मुस्लिम बांधवात विष पेरण्याचा प्रयत्न निलेश राणे यांनी करू नये असेही नागेश मोरये यांनी म्हटले आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!