सतिश मुणगेकर यांना राज्यस्तरीय उपक्रमशील गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर !

मसूरे (प्रतिनिधी) : नवी दिशा,नवे उपक्रम या राज्यस्तरीय शैक्षणिक समूहाच्या वतीने १९ जानेवारी २०२५ ला अहिल्यानगर येथे नवी दिशा नवे उपक्रम भाग – ३ पुस्तक प्रकाशन सोहळा, व महाराष्ट्रातील गुणवंत शिक्षकांना राज्य स्तरीय उपक्रमशील गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून जि. प. पू. प्रा. आदर्श केंद्र शाळा चिखली नं.1, तालुका गुहागर येथील उपक्रमशिल तंत्रस्नेही शिक्षक सतिश पांडुरंग मुणगेकर यांना राज्यस्तरीय उपक्रमशील गुणवंत शिक्षक पुरस्कार 2025 प्राप्त झाला आहे.

गेल्या आठ वर्षांपासून नवी दिशा,नवे उपक्रम समूह सातत्याने सुरू असून महाराष्ट्रातील शिक्षकांना उपक्रम दिशा देण्याचे उत्कृष्ट कार्य करीत आहे.शिक्षक, विद्यार्थी, शाळा यांना या समूहाचा फायदा होत आहे.समूहाच्या माध्यमातून,समूह सदस्यांच्या सहभागातून,देणगी दाते यांनी दिलेल्या मदतीने दरवर्षी नवनवीन सामाजिक, शैक्षणिक उपक्रम आयोजित केले जातात. यावर्षी महाराष्ट्रातील उपक्रमशील शिक्षकांना एकत्रित करून त्यांनी प्रत्यक्ष वर्गात राबविलेल्या उपक्रमांचे पुस्तक प्रकाशन तसेच त्यांनी केलेल्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची समूहातर्फे दखल घेऊन त्यांना राज्य स्तरीय उपक्रमशील गुणवंत शिक्षक पुरस्कार १९ जानेवारी २०२५ रोजी संजोग हॉटेल, नगर मनमाड रोड, सावेडी अहिल्यानगर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. संपादक मंडळाच्या वतीने सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून भव्यदिव्य सोहळा निश्चितच संपन्न होणार आहे. अशी माहिती संपादक/समूह संयोजक श्री.देवराव चव्हाण यांनी दिलेली आहे. या सोहळ्याच्या तयारी , नियोजना करिता प्रकल्प प्रमुख बळीराम जाधव, संगीता म्हस्के, सतिश मुणगेकर सर्व संपादक निर्मिती मंडळ दिनरात्र कष्ट घेताना दिसत आहे. सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून प्रसिद्ध कवी तुकाराम धांडे, प्रसिद्ध लेखिका अंजलीताई अत्रे ,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. दत्तात्रय वारे सर यांची उपस्थिती राहणार असल्याचे संपादकांनी सूचित केले आहे.

error: Content is protected !!