खारेपाटण हायस्कूलची विद्यार्थिनी कु.प्राजक्ता ठाकूर देसाई ही विशेष सन्मानाने सन्मानित

खारेपाटण (प्रतिनिधी) : कै. नीता नीलकंठ दीक्षित यांच्या स्मरणार्थ व सौ मंजिरी निरंजन दीक्षित यांच्या सौज्यन्याने मू.पो.वाडा, ता.देवगड येथे दीक्षित फाउंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भावगीत गायन स्पर्धा – २०२५ या स्पर्धेमध्ये खारेपाटण येथील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटण या प्रशालेची इयत्ता नववीतील विद्यार्थीनी प्राजक्ता अभय ठाकूरदेसाई हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला असून तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

या भावगीत गायन स्पर्धेत कु.प्राजक्ता ठाकूर देसाई हिने सादर केलेल्या ‘जिवलगा कधी रे येशील तू?’ या भावगीताने उपस्थित रसिक प्रेक्षकांची आणि परीक्षकांची वाहवा मिळविली. या तिच्या सादरीकरणाबद्दल तिचा आयोजक आणि परीक्षकांतर्फे विशेष सन्मान करण्यात आला.ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. शीतल धर्माधिकारी यांचे शुभहस्ते पुष्पगुच्छ,सन्मान चिन्ह, भेटवस्तू व प्रशस्तीपत्रक,देऊन तिला गौरविण्यात आले. गेल्या वर्षी सुद्धा या स्पर्धेमध्ये प्राजक्ताने प्रथम क्रमांक पटकावून आपल्या गायन कलेची चुणूक दाखविली होती. खारेपाटण हायस्कूलच्या वतीने नुकताच तिचा हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सानप यांचे शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

प्राजक्ताने अनेक जिल्हा व राज्यस्तरीय गायन स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलेला आहे. प्राजक्ताला प्रशालेचे संगीत शिक्षक संदिप पेंडुरकर सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तर तिच्या या यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे तसेच सर्व संस्था संचालक प्राचार्य संजय सानप सर, पर्यवेक्षक संतोष राऊत सर तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने प्राजक्ताचे अभिनंदन करण्यात आले असून तिला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

error: Content is protected !!