करूळ -गगनबावडा घाट रस्ता सुरु करण्यासाठी शिवसेना पक्षाने घाटस्त्यावर केले जोरदार आंदोलन

पुढील १० दिवसांत घाटरस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरु न झाल्यास पुढचे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी दिला इशारा

घाटरस्त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी लावली तातडीची बैठक

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील करूळ -गगनबावडा घाट रस्ता सुरु करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने करूळ -गगनबावडा घाटात धडक देत जोरदार आंदोलन केले. कोण म्हणतो सुरु होणार नाय सुरु केल्याशिवाय राहणार नाय, भ्रष्टाचारी सरकारचा निषेध असो, घाटमार्गात एकेरी वाहतूक सुरू झालीच पाहिजे,निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा निषेध असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. माजी आमदार वैभव नाईक,माजी आमदार राजन तेली, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन छेडण्यात आले. गेली २ वर्षे हा घाट रस्ता बंद आहे. तारीख देऊनही घाट रस्ता सुरु केला जात नाही. आम्ही विरोधासाठी विरोध करत नाही. परंतु पूर्ण रस्ता बंद ठेऊन रस्त्याचे काम करणे हे राज्यातील पहिले उदाहरण आहे. रस्ता बंद करूनही ठेकेदाराकडून अत्यंत धिम्या गतीने काम सुरु आहे आणि झालेले काम देखील निकृष्ट दर्जाचे आहे. पुढील तीन ते चार महिने तरी घाट रस्त्याचे काम पूर्ण होईल असे वाटत नाही त्यामुळे करूळ – गगनबावडा घाटरस्त्यावरून पुढील १० दिवसांच्या आत एकेरी वाहतूक सुरु करावी अन्यथा पुढील आंदोलन हे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर करण्यात येणार आहे असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी दिला. शिवसेना नेत्यांनी घाट रस्त्याची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यावर जिल्हाधिकारी यांनी तातडीने सोमवारी यासंदर्भात संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठक आयोजित करणार असल्याचे सांगितले.

वैभववाडी तालुक्यातील करूळ -गगनबावडा घाट रस्ता हा व्यापार उद्योगात वृद्धी करणारा आणि मोठ्या प्रमाणात दळणवळण असलेला महत्वाचा घाटमार्ग आहे. गेली २ वर्षे हा घाट रस्ता बंद आहे. त्यामुळे व्यापारी तसेच नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. हा घाट रस्ता सुरु करण्यासाठी ऑक्टोबर २०२४ रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलन केले होते. त्यावेळी डिसेंबर २०२४ मध्ये हा घाट रस्ता सुरु करण्याचे लेखी आश्वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता यांनी दिले होते. मात्र अद्याप पर्यंत हा घाट रस्ता सुरु झालेला नाही. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना निवेदन देऊन १७ जानेवारी २०२५ पर्यंत हा घाटमार्ग सुरु न झाल्यास १८ जानेवारी २०२५ रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार घाट रस्ता सुरु न झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आंदोलन छेडण्यात आले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके, उपजिल्हाप्रमुख बंडू ठाकूर, युवासेना सचिव स्वप्नील धुरी, युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, माधवी दळवी, वैभववाडी येथील मनोज सावंत, यशवंत गवाणकर, शंकर कोकरे, सूर्यकांत परब, लक्ष्मण रावराणे, नितेश शेलार, गणेश पवार, रोहित पावसकर, पांडुरंग पांचाळ, संतोष पाटील,दीपक पवार, संतोष कडू, जयेश पवार, मानसी सावंत, मिलिंद आईर आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!