मालवण (प्रतिनिधी) : रस्त्यामुळे अडगळीत व अर्धवट स्थितीत असलेल्या तहसीलदारांच्या बंगल्याच्या जागेत अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे तहसीलदार वर्षा झालटे यांनी आक्रमक भूमीका घेतली. महसूल, पोलीस, पालिका, बांधकाम आणि दारू बंदी विभाग, भूमी अभिलेख अशा सर्व शासकीय विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तातडीने मोजणी करत संबंधितांना तात्काळ हटविण्याचे आदेश दिले. संबंधितांनी अतिक्रमण स्वतःहून हटविण्यात येणार असे स्पष्ट केले. तहसीलदार यांनी तातडीने बांधकाम विभागाला संपूर्ण जागे भोवताली दगडी कुंपण उभारण्याचे निर्देश दिले. शासकीय जागेमध्ये अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही, असेही तहसीलदारांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, संबंधित व्यक्तीला अतिक्रमण हटविण्याची नोटीस देण्यात आली असून स्वतःहून अतिक्रमण हटविण्यात न आल्यास महसूल प्रशासनाकडून अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याचेही तहसीलदारांनी स्पष्ट केले.
तहसीलदार यांना राहण्यासाठी बांधकाम विभागाकडून अनेक वर्षांपुर्वी एसटी स्टॅण्ड परिसरात एका बंगल्याचे बांधकाम करण्यात आले होते. हे बांधकाम अर्धवट स्थितीत असल्याने ती इमारत आता पूर्णपणे खराब झाली आहे. या बंगल्याकडे जाण्यासाठी प्रशस्त असा रस्ता नसल्याने याठिकाणी आजपर्यंत कोणत्याही तहसीलदारानी गांभिर्याने पाहिले नव्हते. तहसीलदार वर्षा झालटे यांना शासकीय जागेत अतिक्रमण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पाऊले उचलली. यावेळी मंडळ अधिकारी पिटर लोबो, तलाठी दळवी उपस्थित होते.
तहसील बंगला येथे जाण्यासाठी प्रशस्त रस्ता असणे आवश्यक आहे. यासाठी पालिका प्रशासनाने सहकार्य करावे, अशी सूचना यावेळी तहसीलदार झालटे यांनी मुख्याधिकारी जिरगे यांना केली. बंगल्याचे काम पूर्ण करणे अगर नविन बांधकाम करणे याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे बांधकाम विभागाला सांगण्यात आले. रस्ता निर्माण करणे आणि पुढील कार्यवाही तातडीने करण्यासाठी मंडळ अधिकारी व तलाठी यांनीही पाठपुरावा करावे, असेही तहसीलदारांनी सांगितले.
तहसीलदार यांचा बंगला अनेक वर्षे रखडलेला आहे. लाखो रूपये खर्च होऊनही आजपर्यंत एकही दिवस तहसीलदार त्याठिकाणी राहू शकलेले नाहीत. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी महसूल विभागाची प्रशस्त जागा असूनही त्याचाही उपयोग प्रशासनाकडून केला गेला नाही. आता तहसीलदार वर्षा झालटे यांनी आक्रमक भुमीका घेतल्याने तहसीलदार बंगल्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता असन संबंधित जागाही मोकळा श्वास घेण्याची शक्यता आहे. तहर्स यांनी आज घेतलेल्या भुमीकेमुळे सर्वच प्रशासकीय यंत्रणाही कामाला लागल्याचे दिसुन आले.










