पोलीस घटनास्थळी दाखल
मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील वायंगणी माळरानावर शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. संबंधित मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत असल्यामुळे त्याची ओळख पटवणे मुश्किल बनले आहे. दरम्यान, मृतदेहापासून काही अंतरावर एक आधारकार्ड चे कव्हर मिळून आले आहे. त्यावरून मृताची ओळख पटवण्याचे काम पोलीस करीत आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे घटनास्थळी दाखल झाले आहेत. याठिकाणी घातपाताचा संशयही व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना निदर्शनास आल्यानंतर घटनेची माहिती मिळताच आचरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याठिकाणी तपास सुरु असून उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे घटनास्थळी ठाण मांडून आहेत. तर अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक भोसले यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. हा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत असून मृतदेहापासून काही अंतरावर एक आधारकार्ड चे वरचे कव्हर मिळून आले आहे. त्या आधारे मृताची ओळख पटवण्याचे काम पोलीस करीत आहेत. मृतदेहा नजिक पाण्याची बाटली, काही औषधे देखील मिळून आली आहेत. या व्यक्तीचा घातपात झाला की आत्मघात याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.