जिल्ह्याच्या विकासासाठी व्यापारी महासंघाने जिल्ह्याच्या व्यापाराचे धोरण ठरवावे… पालकमंत्री नितेश राणे

व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री म्हणून कायमच सोबत

वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या विकासासाठी, व्यापारी महासंघाने जिल्ह्याचे  व्यापारी धोरण ठरवावे. तुम्ही एकत्र येता तेव्हा व्यापार व जिल्ह्याच्या विकासासाठी निर्णय घ्या. जिल्ह्याच्या विकासासाठी पक्ष बाजूला ठेऊन काम करा. किमान दर तीन महिन्यांनी व्यापारी, शासकीय अधिकारी व पालकमंत्री अशी संयुक्त बैठक घेऊन जिल्ह्यातील व्यापारांच्या समस्या सोडवून जिल्ह्याच्या व्यापाराला नवी ओळख करून देऊया. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुमच्या सोबत आहे. असे आवाहन मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.    

वैभववाडी तालुका व्यापारी संघ आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी एकता मेळाव्यात पालकमंत्री नितेश राणे उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, वैभववाडी व्यापारी संघटना अध्यक्ष तेजस आंबेकर, कार्यवाह नितीन वाळके, नगराध्यक्षा नेहा माईणकर, स्वागताध्यक्ष संजय सावंत, प्रसाद कुलकर्णी, श्रीकांत पाटील, अतिष कुलकर्णी, विनोद मेस्त्री, बाळासाहेब वळंजू, अरविंद नेवाळकर, सर्व तालुकाध्यक्ष, व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नितेश राणे म्हणाले, जिल्ह्यात यापुढे स्थानिक व्यापाऱ्यांना कोणीही त्रास देऊ नये असे आपण प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगितले आहे. जिल्ह्याची आर्थिक समृद्धी महत्त्वाची आहे. यासाठी जिल्ह्यातील नागरिक व व्यापारी यांना सुरक्षित वातावरण देणे ही माझी जबाबदारी आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची ही महत्त्वाची जबाबदारी आहे. बाजारपेठांमध्ये अनधिकृत रित्या कोण काय करतो यावर आपले लक्ष असायला हवे. आपली बाजारपेठ सुरक्षित, स्वच्छ व सुंदर असण्यासाठी आपणही तितकेच सजग असणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्याच्या सुरक्षेतेच्या बाबतीत आपण कोणतीही तडजोड करता कामा नये. मी आमदार असल्यापासून व्यापारी आणि नागरिकाच्या काय अडचणी आहेत हे माहित आहेत.

सरकारच्या संपूर्ण यंत्रणा आपल्यासाठी आहेत.जिल्ह्याचे व्यापार धोरण ठरविण्याची गरज आहे. अधिकृत दुकाने राहिली पाहिजेत. ती वाढली पाहिजेत. अनधिकृत व्यापाराला अंकुश येण्यासाठी आपण जागृत असेल पाहिजे. सर्वजण एकत्र मिळून काम केले पाहिजे. सुरक्षेच्या दृष्टीने तडजोड होता नये. असे सांगताना कणकवलीत १६ लोक थेट युपी मधून येवून व्यापार करतात. नोयेडा  मधील माणूस आपल्या बाजारात बॅग विकत होता. संविधानाने प्रत्येकाला व्यापार व्यवसाय करण्याचा अधिकार दिलेला आहे. मात्र आपल्याला जागृत राहिलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे. सुरक्षेच्या दृष्टीने  या सर्व गोष्टींचा विचार व्यापारी संघानेही केला पाहिजे अशी. मला माझ्या स्थानिक लोकांपेक्षा कोणीही महत्वाचे नाही. असे मंत्री राणे म्हणाले. आता जिल्ह्यात, राज्यात, केंद्रात आमचे स्थिर सरकार आहे. खा. नारायण राणे केंद्रात आहेत. तर आमदार म्हणून निलेश राणे, दीपक केसरकर सारखे अनुभवी नेते आहेत. मी पालकमंत्री आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विकासाचा गाडी आता दुसऱ्या गियरवर नाही. तर जिल्हा चौथ्या गिअरवर चालणार आहे. आता विकास निधी, प्रकल्प, रोजगार याची चिंता करू नका. असे राणे म्हणाले.   

या मेळाव्यात जिल्ह्य व्यापारी महासंघाच्यावतीने पालकमंत्री नितेश राणे यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन नागरी सत्कार करण्यात आला. तसेच माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे हे मेळाव्याला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांचा सत्कार देखील नितेश राणे यांनी स्वीकारला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने घोषित करण्यात आलेले पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार प्राप्त व्यापारी टी एस घोणे, नयन मोरे, श्रीमती सरोजिनी भोवड, श्रीराम शिरसाट, भैय्या सामंत यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष संजय सावंत यांनी केले. यावेळी मनोगत नितीन वाळके, नेहा माईणकर, तेजस आंबेकर यांनी केले. संपूर्ण मेळाव्याचे सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र पाताडे यांनी केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठ्या संख्येने व्यापारी बांधव या मेळाव्याला उपस्थित होते. व्यापारी मेळाव्याचे नियोजन चांगले केल्याबद्दल वैभववाडी व्यापारी संघटनेचे सर्व व्यापारी बांधवांनी आभार मानले.

error: Content is protected !!