मालवण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथ. शिक्षणाधिकारी यांना अनेक वेळा निवृत्त शिक्षकांच्या प्रश्नांबाबत निवेदन दिले. प्रत्येक वेळी आश्वासने मिळाल्याने आंदोलने मागे घेण्यात आली. पण यावेळी त्यांना पुन्हा निवेदनाद्वारे प्रश्न सोडविण्यास सांगितले आहे . यावेळी जर प्रश्न सोडविले नाहीत तर मी स्वतः उपोषणाला बसणार आहे. यावेळी तुम्ही सर्व शिक्षकांनी मला साथ द्यावी असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथ. शिक्षक असोसिएशनचे जिल्हाअध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी केले आहे.
मालवण तालुक्यातील सेवानिवृत्त प्राथ. शिक्षक, पदवीधर, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि कुटुंबवेतन धारक यांचा आनंदमेळावा नुकताच मालवण तालुका अध्यक्ष विजय चौकेकर यांचे अध्यक्षतेखाली जानकी मंगल कार्यालय कुंभारमाठ येथे पार पडला. यावेळी ते उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत विचारमंचावर तालुका अध्यक्ष विजय चौकेकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाशभाई दळवी आणि ना. य. सावंत, जिल्हा सरचिटणीस सुंदर पारकर, जिल्हा सदस्य कृष्णा पाताडे, सरिता मुननकर, रुद्राजी भालेकर आणि मनोहर जोगल, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष झिलू गोसावी, कणकवली तालुकाध्यक्ष शंकर बागवे, माजी तालुकाअध्यक्ष चंद्रकांत तेली, माजी सचिव अनिल मालवदे, उपाध्यक्ष शिवराम सुतार, सावंतवाडी तालुकाध्यक्ष रामनाथ राऊळ, देवगड तालुकाध्यक्ष मधुकर राणे, सचिव रावजी परब, सेवानिवृत्त सैनिक मधुसुदन सारंग आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सानेगुरुजींच्या खरा तो एकचि धर्म या प्रार्थनेने करण्यात आली. दिवंगतांना श्रद्धाजली वाहिल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. तसेच शिवाजी महाराज, शाहू महाराज, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि गुलाब पुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर सचिव अरुण गोसावी यांनी प्रास्ताविक केले.
सेवानिवृत्तांचा सन्मान
मालवण तालुक्यातील नुकतीच वयाची ५८ वर्ष पूर्ण करून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना गुरुवर्य जीवनसाधना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, गुलाब पुच्छ, ग्रंथ भेट आणि सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
७५ वर्ष पूर्ण झालेल्यांचा सत्कार
वयाची ७५ वर्ष पूर्ण केलेल्या शिक्षकांना अमृतमहोत्सवी शिक्षण तपस्वी पुरस्कार देताना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, ग्रंथभेट आणि सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित सेवानिवृत्त शिक्षकांनी आपले कलागुण सादर केले. यामध्ये विजय चौकेकर यांनी स्वर्गात आकाश गंगा हे गाणे स्वतः नाचून गाऊन आणि उपस्थित शिक्षकांकडून नाचून आणि गाऊन घेतले. तर सदानंद कांबळी, दिपक पाताडे, कृष्णा गोसावी, सुगंधा गुरव, चंद्रकांत कदम यांनी आपले कलागुण सादर केले.
ज्येष्ठ शिक्षक श्रीकृष्ण पाडगांवकर यांचा सत्कार केल्यानंतर त्यांनी असोशिएशनचे आभार मानून शुभेच्छा दिल्या. प्रकाश भाई दळवी यांनी आपल्या मनोगतात मालवण तालुक्याने आनंद मेळावा आयोजित केला आणि तो प्रत्यक्षात खऱ्या अर्थाने सर्व शिक्षकांकडून कृतीतून उतरवून घेतला. मालवण तालुका अध्यक्ष विजय चौकेकर आपल्या नवनवीन संकल्पनेतून मेळाव्यात रंजकता आणून जिल्हयाला मार्गदर्शक ठरेल असा स्नेहमेळावा साजरा करीत आहेत. त्यांचे आणि त्यांच्या कार्यकारीणीचे कौतुक करावे तेवढेच कमी आहे.
ना. य. सावंत यांनी सेवानिवृत्त शिक्षकांचा गुरुवर्य जीवनसाधना दिलेला पुरस्कार आणि अमृत महोत्सवी वर्ष पुर्ण केलेल्या ज्येष्ठांचा अमृत महोत्सवी ज्ञान तपस्वी पुरस्कार हि पुरस्कारांना दिलेली नावेच शिक्षकांचे कर्तृत्व सांगून जातात. जिल्ह्यात प्रथमच असे पुरस्कार देऊन मालवण तालुक्याने शिक्षकांचा केलेला सन्मान हा प्रेरणादायी आहे. त्याबद्दल मालवण तालुक्याचे विशेष कौतुक.
यानंतर झिलू गोसावी, शंकर बागवे, मधुकर राणे, रामनाथ राऊळ यांनीही आपले विचार मांडले. आपल्या अध्यक्षीय भाषणात विजय चौकेकर यांनी शिक्षकांनी आनंदी आणि समाधानी कसे रहावे या विषयी मार्गदर्शन करताना तणावमुक्त आणि आनंदी राहण्याची काय करावे हे समजावून दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुगंधा गुरव यांनी केले तर आभार प्रदर्शन रामचंद्र वाळके यांनी केले.












