विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांनी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या संकल्पनेचे केले कौतुक
सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : जेव्हा पोलीस स्टेशन च्या भिंतींच नागरिकांशी गुन्ह्यांबाबत घ्यायच्या खबरदारी बाबत बोलू लागतात तेव्हा खाकी वर्दीवर चा आम जनतेचा विश्वास आणखी दुणावतो. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या संकल्पनेतून सायबर क्राईमबाबत जनजागृती करणाऱ्या बोलक्या भिंती असणारे कोकणातील पहिले पोलीस स्टेशन ठरलंय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले पोलीस स्टेशन ! वार्षिक तपासणीदरम्यान कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांनी जेव्हा एसपी सौरभ अग्रवाल यांच्यासह वेंगुर्ले पोलीस ठाण्याला भेट दिली, तेव्हा जनजागृती करणारं बोलक्या भिंतींचे पोलीस स्टेशन पाहून त्यांनीही एसपी सौरभ अग्रवाल आणि पीआय अतुल जाधव यांचे विशेष कौतुक केले. हायटेक झालेल्या आजच्या जमान्यात सायबर क्राईम हा गुन्हेगारी जगताचा मोठा चेहरा बनला आहे. ऑनलाइन फ्रॉड, लग्नाचे आमिष दाखवून पैसे लाटणे, अफवांवर विश्वास ठेवून होणारे गुन्हे, इंटरनेट वापरताना घ्यावयाची काळजी, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर हँडल बाबत ची जनजागृती करणाऱ्या चित्रांच्या माध्यमातून वेंगुर्ले पोलीस स्टेशनच्या भिंती बोलक्या झाल्या आहेत. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या संकल्पनेतून वेंगुर्ले पोलीस ठाण्याच्या भिंती बोलक्या झाल्या आहेत. सायबर क्राईम बाबत पोलीस दलाच्या वतीने कॉलेज, शाळा , सार्वजनिक ठिकाणी मेळावे घेत , जनतेशी, कॉलेजवयीन युवाईशी संवाद साधत सायबर क्राईम बाबत नेहमीच जनजागृती केली जाते. त्याहीपुढे जात बोलक्या भिंतींद्वारे सायबर क्राईमबाबत जनजागृती करणारे वेंगुर्ले पोलीस स्टेशन कोकणातील पहिले ठरले आहे. वेंगुर्ले पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारावरच पुरुष पोलीस आणि महिला पोलिसांचे चित्र असू आत प्रवेश केल्यावर भिंतींवर ठिकठिकाणी चित्रांद्वारे सायबर क्राईम बाबत जनजागृती करण्यात आली आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या उक्तीप्रमाणे गुन्हा घडल्यानंतर डोक्यावर हात मारून घेण्यापेक्षा त्याआधीच आपण सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घ्यावी तसेच ऑनलाइन फ्रॉडपासून स्वतःला कसे वाचवता येईल याचे अगदी सहजसोप्या भाषेत चित्रांच्या माध्यमातून केलेले मार्गदर्शन आम जनतेलाही शहाणे करून सोडते. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या याच संकल्पनेचे आय जी पवार यांनी अगदी मुक्तकंठाने आज कौतुक केले. वेंगुर्ले पोलीस ठाणे आवारातील अंतर्गत स्वच्छता , रंगरंगोटी बाबत ही आयजी पवार यांनी समाधान व्यक्त केले.