तळेरे (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध लेखक, कवी डॉ.अनिल अवचट यांच्या कवितांचे चित्रफित द्वारे व संत कबीरांचे दोहे यांच्या गायनाने तळेरे येथील “अनवट अनिल… एक कबीर” हा वेगळा संगीत मैफिलीचा कार्यक्रम मधु कट्टयावरती रंगला. तळेरे येथील संवाद परिवाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी गायिका कविता खरवंडीकर यांनी कबीरांचे दोहे गायन केले.
या संगीत मैफिलीला गायिका कविता खरवंडीकर, धनंजय खरवंडीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सार्वगौड, निलायमचे वामन पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कविता खरवंडीकर, धनंजय खरवंडीकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आणि पार्श्वभूमी धनंजय खरवंडीकर यांनी विषद केली.
या संगीत मैफिलीच्या पहिल्या टप्प्यात सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांच्या पाच कवितांचे चित्रफिती द्वारे सादरीकरण केले. यामध्ये जगणे होते सुंदर, जाई अंधाऱ्या वाटेने, मन घायाळ घायाळ, वाटेत चालताना आणि उंच भरारी अशा पाच संगीतबद्ध कविता चित्रफितीद्वारे सादर करण्यात आल्या. या कवितांची पार्श्वभूमी कविता खरवंडीकर यांनी स्पष्ट केली.
या मैफिलीच्या दुसऱ्या टप्प्यात गायिका कविता खरवंडीकर यांनी कबीरांचे विविध दोहे गायन केले. या संपूर्ण कार्यक्रमात गायिका कविता खरवंडीकर, संगीत आणि तबला धनंजय खरवंडीकर तर संवादिनी विश्वास प्रभुदेसाई यांनी साथ केली. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सार्वगौड यांनी डॉ.अनिल अवचट यांच्या जीवन प्रवासातील आठवणी जाग्या केल्या. तसेच आपल्याला आपल्या जीवनातील आनंद कशाप्रकारे शोधता येईल आणि घेता येईल याविषयी अनमोल विचार मांडले. त्याचबरोबर डॉ.अनिल अवचट यांचे विचार पुढे नेण्यासाठी व खरवंडीकर या व्दयींची संकल्पना अतिशय उत्तम असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले. या काव्य मैफिलीला सर्व उपस्थित रसिकांनी टाळ्यांचा उत्तम प्रतिसाद दिला. दीड तास ही मैफिल रंगली होती.


