केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढला जाईल; राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही
ओरोस (प्रतिनिधी) : कोकण रेल्वेच्या सहा स्टेशनवरील समस्या सोडावीत शासनाच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरात लवकर सुविधा पूर्ण केल्या जातील. कोकण रेल्वे वरिष्ठ अधिकारी, सीएमडी आणि प्रवासी समन्वय समिती यांचा येत्या काही दिवसात स्टेशनपाहणी दौरा करू. तसेच रेल्वेच्या विविध जलद गाड्या आणि सिंधुदुर्ग, वैभववाडी स्टेशनवर पीआरएस सिस्टीम बाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री कक्षाच्या उद्घाटनानंतर कोकण रेल्वे प्रवासी समितीचे अध्यक्ष प्रकाश पावसकर, जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन कोकण रेल्वेच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय सर्वगोड, साई आंबेरकर, शुभम परब, संजय वालावलकर, स्वप्निल गावडे आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी झालेल्या चर्चेत कोकण रेल्वेच्या जिल्ह्यातील स्टेशन वरील अनेक समस्या प्रवाशांना त्रासदायक ठरत आहेत. या समस्या आणि सुविधा बाबत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत झालेल्या करारानुसार त्या राज्यशासनाच्या निधीतून लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू. तसेच कोकण रेल्वेच्या जलद गाड्या व अन्य सुविधांबाबत रेल्वेचे सीएमडी, वरिष्ठ अधिकारी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि कोकण रेल्वे प्रवासी समन्वय समिती यांचा येत्या आठ दिवसात दौरा आयोजित करण्याबाबत निर्णय घेऊ. तसेच या सर्व प्रश्नांना न्याय देण्यासाठी आणि अडीअडचणी सोडविण्यासाठीजिल्ह्यातील आमदार, खासदार, रेल्वे प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि कोकण रेल्वे प्रवासी समन्वय समिती यांची संयुक्त बैठक आयोजित करून कोकण रेल्वेच्या प्रवाशांना होणाऱ्या समस्यांबाबत तोडगा काढू. सिंधुदुर्ग आणि वैभववाडी या कोकण रेल्वेच्या स्टेशनवर पी आर एस सिस्टीम सुरू करण्याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री यांची तातडीने पत्रव्यवहार करून ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करेन, अशी ग्वाही पालकमंत्री राणे यांनी यावेळी दिली.
