तळेरे (प्रतिनिधी) : समाज हा परिवर्तनशील असतो,आपण आपले दृष्टिकोन बदलले तर समाजात स्त्री-पुरुष हा भेदभावच मुळी राहणार नाही. आपण सर्वजण मानव आहोत आणि आपल्याबरोबर दुसऱ्यालाही जगण्याचा तितकाच अधिकार आहे,या गोष्टींशी आपण ठाम असलो तर कोणत्याही स्त्रीवर अत्याचार होणार नाहीत. एकमेकांना माणूस म्हणून स्वीकारण्यातच खरा महिला सन्मान आहे.असे प्रतिपादन इंटरनॅशनल वेदिक गणिताच्या ट्रेनर रूपाली कदम यांनी केले.त्या वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,तळेरे येथे जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमप्रसंगी बोलत होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात रोपट्यास पाणी घालून करण्यात आली.तसेच स्त्री जीवनावर आधारित गीत प्रशालेच्या विद्यार्थीनींनी गायन केले. प्रशालेचे संगीत शिक्षक अजीत गोसावी व माजी विद्यार्थी साईश खटावकर यांनी संगीत साथ दिली. यावेळी कासार्डे पेट्रोल पंपच्या सर्वेसर्वा व कार्यक्रमाच्या अध्यक्ष शामल पोकळे,संतोषी पोकळे, अपर्णा मुद्राळे,शाळा सदस्य शरद वायंगणकर,प्राचार्य अविनाश मांजरेकर,जेष्ठ शिक्षिका धनलक्ष्मी तळेकर, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक सचिन शेटये यांनी केला.
संकट आलं म्हणून खचून न जाता आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद ठेवा यश आपल्या हाती आहे असे प्रतिपादन शामल पोकळे यांनी यावेळी केले. स्वतःच्या प्रगती बरोबर इतरांच्या प्रगतीचा सन्मान करणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा सन्मान आपण करायला हवा असे मत प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडले.
देशासाठी प्रत्यक्ष झटणाऱ्या महिलांबरोबरच तळागाळातल्या महिला तितक्याच ताकदीने समाज परिवर्तनाचे काम करत असतात,त्यांचा सन्मान करण हे आमचे आद्य कर्तव्य आहे म्हणूनच प्रत्येक व्यक्तीपर्यंत गावापासून जगापर्यंतच्या चालू असलेल्या घडामोडींची माहिती पोहोचवावी हा प्रामाणिक हेतू ठेवून गेली 22 ते 25 वर्षे तळेरे येथे वर्तमानपत्र वितरण करणाऱ्या अपर्णा अरविंद मुद्राळे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. स्वतःबरोबर आपल्या पूर्ण कुटुंबाला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या नांदगाव येथील जयबून हवालदार यांचाही यावेळी प्रशालेमार्फत शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह आणि संतोष परशुराम तळेकर यांच्यातर्फे रोख रक्कम 1001 रु. देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.शिक्षिका सुचिता सुर्वे व आभार संस्कृती पडवळ यांनी मानले.
