३ एप्रिलला मनसेचे भीक मांगो आंदोलन धडकणार जिल्हाधिकारी कार्यालयावर

सरकारच्या जुलूमशाही विरोधात जनतेने एकत्र यावे; परशुराम उपरकर यांचे आवाहन

कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रसरकार सध्या सर्वांना आधार कार्ड पॅन कार्डला कनेक्ट करण्याची सक्ती करतेय तसेच आता 1000 रुपयांचा दंड आकारला आहे. मात्र अनेक गावागावांत अजूनही नेटवर्कची सुविधा नाहीय. केवळ टॉवर उभारून लोकप्रतिनिधींनी विकासाच्या पोकळ बाता केल्यात. देशाला लुबाडून गेलेल्यांना सरकार सूट देतंय आणि सर्वसामान्य जनतेच्या डोक्यावर नसत्या खर्चाचा बोजा टाकतेय. गॅसवर देण्यात येणारी सबसिडीदेखील बंद केली गेलीय. मोफत उज्वला गॅसच्या बाबतीतही आता पैसे आकारले जातायत. सुरुवातीला २-३ रुपयांमध्ये रेशन दिलं आणि आता त्याबदल्यात १५० रुपये देण्याचं म्हणत आहेत. या १५० रुपयांत काय येणार त्याचा खुलासा सरकारच्या प्रतिनिधींनी करावा. शेती अवजारांचे, बियाणांचे दर वाढले आहेत. इंधनांचे दर गगनाला भिडले आहेत. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर सरकार हे जनतेच्या कल्याणासाठी आहे की त्यांना लुबाडण्यासाठी आहे त्याचा विचार जनतेने करावा. यासाठीच सरकारला जाग आणण्यासाठी आणि जनतेचा आवाज शासन दरबारी पोहोचविण्यासाठी मनसे ३ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीक मांगो आंदोलन करणार आहे. या आंदोलनाला शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले आहे.

आधी रेशन कार्डची सक्ती नंतर आधार कार्डची आणि आता पॅन कार्डची. बँकेची शून्य बॅलन्सवर अकाऊंट खोलली जातायत. मात्र 1 वर्षांनंतर ते अकाऊंट ऑपरेट न केल्याने १०००-१२०० रुपयांचा दंड घेतला जातोय. नोकरीच्या आशेत असणाऱ्या तरुणांना अजून काही मिळालं नाहीय. विकासकामांची अजून 13 कोटींची बिले बाकी असून पालकमंत्री, आमदार,खासदार काय करतायत हे समजून घ्यावे. जिल्ह्याचे आमदार केसरकर हे राज्याचे शिक्षणमंत्री आहेत आणि त्याच जिल्ह्यात शिक्षकांचे उपोषण सुरु आहे. त्यांच्याकडे पाहायला शिक्षणमंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार यांना वेळ नाही. अशा माणसांना आता घरात बसवण्याची गरज आहे. त्यामुळे मनसेच्या या आंदोलनात सर जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!