धक्काबुक्की, बाचाबाची आणि मारहाण

देवगड तालुक्यात पाणी प्रश्न पेटला

गिर्ये ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकांसह सरपंच, सदस्यांना ग्रामस्थांनी ठेवले कोंडून

देवगड (प्रतिनिधी) : गिर्ये ग्रामसभेत प्रश्नावरून ग्रामपंचायत सदस्या व ग्रामस्थ यांच्यामध्ये बाचाबाची व धक्काबुक्की होऊन राग आल्याने सभेच्या हॉलच्या दरवाजालाच बाहेरून कडी घालून सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व ग्रामस्थ यांना
कोंडून ठेवले. याप्रकरणी तक्रारीवरून पती पत्नीविरोधात विजयदूर्ग पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मार्च महिना अखेरीस गावा गावांमध्ये पाणीप्रश्न भीषण बनत असून अशाच पाणीप्रश्नावरून चक्क ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्या व ग्रामस्थ यांच्यामध्ये वाद धक्काबुक्की, किरकोळ मारामारी होवून राग आल्याने सभेतून बाहेर पडलेल्या ग्रामस्थ पती-पत्नी यांनी सभागृहाच्या दरवाजाला बाहेरून कडी लावून सरपंच, ग्रामसेवकांसहीत ग्रामस्थ सदस्यांना कोंडून ठेवल्याची घटना ३१ मार्च रोजी झालेल्या गिर्ये ग्रामसभेत झाली. याप्रकरणी पती पत्नी नीता संतोष पुजारे व संतोष लक्ष्मण पुजारे यांच्याविरोधात विजयदुर्ग पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ३१ मार्च रोजी सकाळी ११.५० वा. सुमारास झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, गिर्ये ग्रामपंचायतीची ग्रामसभा ३१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता ग्रा.पं. सभागृहात सरपंच,ग्रा.पं.सदस्य, ग्रामसेवक व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सुरू होती. दरम्यान सभेला उपस्थित ग्रामस्थ नीता संतोष पुजारे व संतोष लक्ष्मण पुजारे यांनी सभेत पाण्याचा प्रश्न मांडला असता ग्रामपंचायत सदस्या प्रांजली कोलुंगडे व त्यांच्यामध्ये बाचाबाची होवून धक्काबुक्की झाली. यामध्ये महिला सदस्य व महिला ग्रामस्थ यांच्यामध्ये किरकोळ मारामारी झाली.ग्रा मसभेत अशाप्रकारे गोंधळ झाल्यानंतर त्याचा राग आल्याने पुजारे पती-पत्नी ही दोघेही सभागृहाबाहेर पडली व त्यांनी सभा सुरू असलेल्या हॉलच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली व सभेला उपस्थित असलेल्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ यांना आत कोंडून ठेवले. याबाबत गिर्ये ग्रामसेवक आदित्य संतोष कदम यांनी विजयदुर्ग पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नीता संतोष पुजारे व संतोष लक्ष्मण पुजारे या पती पत्नीविरोधात भादवि कलम ३५३, ३४२, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरिक्षक रवी जाधव करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!