जनतेला एकाच ठिकाणी सर्व विभागांच्या योजनांची माहिती मिळणार आणि प्रस्ताव सादर करता येणार
नागरिक सुविधा कक्ष स्थापन करणारी ठरली जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती
कणकवली प्रतिनिधीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार राज्यात सर्व प्रशासकीय कार्यालयांत १०० दिवसांचा १० कलमी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने कणकवली पंचायत समिती कार्यालयामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत नागरिक सुविधा या स्वतंत्र विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली असून त्याचे उद्घाटन गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर , यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर व सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे. नागरिक सुविधा कक्ष स्थापन करणारी कणकवली पंचायत समिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिली पंचायत समिती ठरली आहे. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, विस्तार अधिकारी प्रमोद ठाकूर, संजय कवटकर, कक्ष अधिकारी अनिल चव्हाण , कक्ष अधीक्षक मनिषा देसाई, सर्व कर्मचारी उपस्थित होते. नागरिक सुविधा कक्ष तळमजल्यावर प्रवेशद्वारानजिक सुरू करण्यात आला आहे. नागरिक सुविधा कक्षामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या सर्व विभागांच्या विविध योजना, योजनांचे लाभार्थी निकष, प्रस्ताव सादरीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे यांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. नागरिक सुविधा कक्षामध्ये स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. विविध योजनांची माहिती दिल्यानंतर जनतेच्या शंकांचे निरसन करून जिल्हा परिषद मधील सर्व विभागांचे प्रस्ताव याच नागरिक सुविधा कक्षामध्ये स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे जनतेला मारावे लागणारे हेलपाटे वाचणार असून वेळेचा अपव्यय टळणार आहे. एकाच ठिकाणी जिल्हा परिषद च्या सर्व विभागांच्या योजनांची सविस्तर माहिती देणे आणि संभाव्य लाभार्थ्यांचे प्रस्ताव सुद्धा सादर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या नागरिक सुविधा कक्षाचे जनतेतून स्वागत होत आहे.