वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी गावचे सुपुत्र डॉ. रविंद्र जाधव यांचे नाव ” लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये नोंदवले गेले असून, त्यांच्या निस्वार्थ आणि सातत्यपूर्ण समाजकार्यासाठी हा गौरव प्रदान करण्यात आला आहे. लंडनवरून अधिकृत सन्मान प्रमाणपत्र नुकतेच प्राप्त झाले असून, या अनोख्या क्षणाची घोषणा ३० मार्च २०२५ रोजी एका संगीतमय कार्यक्रमात करण्यात आली.
हा ऐतिहासिक सन्मान प्रसिद्ध जल रणरागिणी डॉ. मनीषा गांगुर्डे आणि प्रसिद्ध गायक चंद्रकांत शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या गौरवामागे डॉ. मनीषा गांगुर्डे यांचे मोलाचे योगदान असून, त्यांनीच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करत लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड संस्थेशी सातत्याने संवाद साधत हा सन्मान मिळवून दिला. या साऱ्या प्रयत्नांबद्दल डॉ. रविंद्र जाधव यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत.
डॉ. रविंद्र जाधव यांचा प्रवास म्हणजे संघर्ष, सेवा आणि मानवतेच्या मूल्यांची जिवंत शिकवण आहे. वृद्ध, गरिब, उपेक्षित यांच्यासाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य समर्पित केले आहे. आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबई कल्याण येथे वृद्धांसाठी वृद्धाश्रम, अनाथ मुलांचे वस्तीगृह, संविधान दवाखाना की ज्या दवाखान्यांमध्ये वृद्धांवर मोफत उपचार केले जातात. मनोरुग्णांचे पुनर्वसन, बेघर हाऊस अशा माध्यमातून गेली अनेक वर्ष समाजाची सेवा करीत आहेत.या कामात त्यांच्या पत्नी सुरेखा जाधव त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना साथ देत आहेत.त्यांच्या या कार्याची दाखल लंडन बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे.
संविधान सैनिक संघ, माणुसकी धर्म प्रतिष्ठान, डॉक्टर मित्र चॅरिटेबल ट्रस्ट या संस्था आणि समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. जाधव यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे