तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयात उद्या मंगळवार दि.८ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय उर्दू परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा परिसंवाद आणि बक्षिस वितरण समारंभ सकाळी 9.30 ते सायं. 4 वा. या वेळेत तळेरे हायस्कूलच्या डॉ. एम. डी. देसाई सांस्कृतिक भवनात होणार आहे.
उर्दू वाचन अभियान २.० संपूर्ण राज्यभर उर्दू माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वी तील विद्यार्थ्यांसाठी सन २०२४-२५ मध्ये राबविण्यात येत आहे. या अंतर्गत दि. १८ ते २० सप्टेंबर २०२४ या दरम्यान तीन दिवसीय घटक संच विकसन कार्यशाळा घेण्यात आली. दि. ८ व ९ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यस्तरीय सुलभकांचे प्रशिक्षण झाले. यानंतर जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रशिक्षण पूर्ण झाले. प्रत्येक बुधवारी व शनिवारी शाळांमधून एक तास उर्दू वाचन अभियान हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानाची यशस्वीता पाहण्यासाठी जिल्हास्तरावर व राज्यस्तरावर उर्दू परिसंवाद (Symposium) आयोजित करण्याचे सुचवले आहे. त्यानुसार हा परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे. या परिसंवादाचे उद्घाटन सकाळी 9.30 वाजता होणार असून यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य राजेंद्र कांबळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी, उर्दूचा विभागप्रमुख आर आर जाधव, उर्दू विस्तार अधिकारी श्रीम.आवटी, राज्यस्तरीय उर्दू भाषा एम्बेसिडर फैजुल्ला खान, प्राचार्य मुनाफ गुहागरकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या परिसंवादाच्या दुसऱ्या सत्रात ज्या शाळांनी व शिक्षकांनी उर्दु वाचनामध्ये उत्कृष्ट काम केले आहे त्यांचाही गौरव व कौतुक करण्यात येणार आहे. या उर्दू परिसंवादासाठी प्रत्येक तालुक्यातील जिल्हास्तरीय उर्दू वाचनदूत, तालुकास्तरीय उर्दू वाचनदूत व सदर परिसंवादात शाळांचे शिक्षक सहभागी होणार आहेत. यावेळी उर्दू वाचन अभियान २.० यशस्वीपणे राबविलेल्या शिक्षकांची यशोगाथा पी.पी.टी, पोस्टर व TLM सादरीकरण (विद्यार्थी वाचन अभिव्यक्तीसाठी) यामध्ये करण्यात यावे.