सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आपल्या चुलत्यावर ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारा आरोपी प्रसाद नितीन धुमाळ ( रा.वारगाव ) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने नामंजूर केला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. १२ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी साडेअकरा च्या सुमारास आरोपी प्रसाद धुमाळ याने आपले चुलत चुलते दशरथ सोमा धुमाळ आणि चुलत चुलती अनिता दशरथ धुमाळ यांच्यावर दशरथ यांच्या राहत्या घरात कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात जखमी दशरथ यांच्या मानेवर वार केले. आरोपी प्रसाद ला अडवायला गेलेल्या अनिता हिच्या बोटावर कोयत्याने वार केला होता. या गुन्ह्यात आरोपी प्रसाद याला कणकवली पोलिसांनी अटक केली होती. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे करत होते. न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी प्रसाद याने सादर केलेल्या जामीन अर्जाला पुढील मुद्द्यांवर सरकारी वकील रुपेश देसाई यांनी हरकत घेतली. हाफ मर्डर सारखा गंभीर गुन्हा आरोपी प्रसाद ने केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले, जामीन मिळाल्यास आरोपी जखमी साक्षीदार दशरथ यांच्या जीवितास धोका निर्माण करू शकतो, वैयक्तिक हेवेदावे आणि पूर्वीपासून मनात असलेल्या रागाने आरोपीने गुन्हा केला असून पुन्हा तो असा गुन्हा करू शकतो,आरोपी मुंबई येथे राहायला असून केस सुनावणीवेळी कोर्टात हजर राहण्याची शक्यता कमी आहे,जखमी साक्षीदार दशरथ धुमाळ यांच्यावर मुंबई येथील खाजगी रुग्णालयात अद्याप न्यूरो व ऑर्थो सर्जन कडून उपचार सुरू असून ते अद्याप घरातील लोकांना अथवा कोणालाही ओळखत नाहीत. जखमी दशरथ अँस्टेबल असलेल्या अवस्थेत त्यांना आरोपीला जामीन मिळाल्याचे समजल्यास त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊन आरोपीच्या भीतीने त्यांच्या प्रकृतीत बिघाड होऊ शकतो.त्यामुळे आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर करावा असा युक्तिवाद सरकारी वकील देसाई यांनी केला. सरकारी वकील देसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी प्रसाद धुमाळ याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला.