वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकीसरे बेळेकरवाडी येथील पायावाटेचा प्रश्न हा न्याय प्रविष्ट असल्यामुळे या प्रकरणात प्रशासन हस्तक्षेप करू शकत नाही. आपण चुकीच्या पद्धतीने उपोषण करून प्रश्न सुटणार नाही त्यामुळे आपण उपोषण मागे घ्यावे असे आवाहन तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी ग्रामस्थांना केले. त्यामुळे अखेर ग्रामस्थांनी सायंकाळी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. कोकिसरे बेळेकरवाडी येथील ग्रामस्थांनी पूर्वपरंपरागत असलेली पायवट खुल्ली करावी. यासाठी सोमवारी सकाळी 11:00 वाजल्यापासून तहसीलदार कार्यालय वैभववाडी समोर उपोषण सुरू केले होते. वयोवृद्ध आजारी महिलासह ग्रामस्थ सहभागी झाले होते. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार बेळेकरवाडी वस्तीपासून सुमारे दहा ते पंधरा मिनिट अंतरावर इंडियन ऑइल कंपनीचा सीएनजी पंप करिता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वाणिज्य परवानगी देण्यात आलेली आहे. या पंपाचे मालक प्रसाद शिरवडेकर यांनी खोटी कागदपत्रे करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून ग्रामस्थांची पूर्व परंपरागत सुरू असलेली पायवाट बंद केली आहे. या वहिवाटीच्या वाटेसाठी बेळेकरवाडी ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदन देऊनही,प्रशासनाकडे दाद मागूनही कोणीच त्याची दखल घेत नसल्यामुळे अखेर 14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशीच त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला. यामध्ये दिलीप बेळेकर, सुंदराबाई बेळेकर, दीपिका बेळेकर, योगिनी बेळेकर, तुकाराम रोगे, समीर बेळेकर, विजय बेळेकर, यांच्यासह ग्रामस्थ सहभागी होते. वैभववाडी तहसीलदार पाटील यांनी दुपारी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली मात्र उपोषणकर्ते आपल्या उपोषणावर ठाम होते. सायंकाळी पुन्हा तहसीलदार पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आपण आपल्या मागणीसाठी कोर्टाच्या निर्णयाची वाट बघावी लागेल. हा प्रश्न न्याय प्रविष्ठ असल्यामुळे प्रशासन म्हणून आम्ही काही करू शकत नाही. त्यामुळे आपण उपोषण मागे घ्यावे असे पुन्हा एकदा आवाहन केले. तसेच सरपंच प्रदीप नारकर यांनीही कोकिसरे ग्रामपंचायत आपल्याला आवश्यक ते सहकार्य करील असे सांगितले. अखेर तहसीलदार व सरपंच यांच्या शब्दाला मान देत सायंकाळी उशिरा उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी आर डी. जंगले, विस्तार अधिकारी लक्ष्मण हांडे ग्रामसेवक श्री वाघमोडे, दाजी पाटणकर,उपसरपंच समीक्षा पाटणकर, बाळा बेळेकर, सुनील नारकर, युवक काँग्रेस अध्यक्ष भालचंद्र जाधव आदी उपस्थित होते.
दरम्यान उपोषणकर्ते दिलीप बेळेकर यांची दुपारी तब्बेत बिघडल्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत…