राज्य, राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडू व प्रशिक्षकासाठी रेल्वे सवलत पुन्हा सुरु करावी

शिर्डीतील शारीरिक शिक्षण शिक्षक दुसऱ्या क्रीडा महाअधिवेशनात १९ ठराव एकमताने मंजूर!

शिर्डी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण महामंडळ अमरावती, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ व इतर सहयोगी संस्था च्यावतीने सप्तपदी मंगल कार्यालय शिर्डी’ येथे दि.१२ ते १४ एप्रिल रोजी आयोजित दुसऱ्या शारीरिक शिक्षण शिक्षक क्रीडा महाअधिवेशनाचे नुकतेच शिर्डीत सुप वाजले, या महाअधिवेशनात राज्यभरातून बहुसंख्य शारीरिक शिक्षण शिक्षकांनी हजेरी लावली होती. उपस्थित शिक्षकांमधून राज्य शासनाकडे काही मागण्यांचा पाठपुरावा करण्याबाबत ठराव घेण्यात आले. उपस्थित सर्व शारीरिक शिक्षक शिक्षकांनी दोन्ही हात उंच करून या ठरावाला मंजुरी दिली.यामध्ये ‘शाळा तिथे शारीरिक शिक्षण विषयाचा शिक्षक’ असावा यासारखे तब्बल १९ ठराव करण्यात आले,या मागणीला शासन दरबारी पाठपुरावा करून विषयाचे अस्तित्व अबाधित ठेवणे,विषयाला आणि विषय शिक्षकाला योग्य दिशा देणे व भावी पिढीतील युवा शारीरिक शिक्षण शिक्षकांना न्याय देण्याच्या दृष्टीने सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

याप्रसंगी व्यासपीठावर शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वयक समितीचे अध्यक्ष विश्वनाथ पाटोळे,कार्याध्यक्ष तथा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर, उपाध्यक्ष शिवदत्त ढवळे, सरचिटणीस ज्ञानेश काळे, आयोजन समितीचे अध्यक्ष संजय चव्हाण, संजय पाटील, सहसचिव डॉ.जितेंद्र लिंबकर, डॉ.आनंद पवार, राजेश जाधव, प्रितम टेकाडे, सुनील गागरे,अनिल पाटील, राजेंद्र कोहकडे, बी.डी.जाधव,जालिंदर आवारी,अशोक देवकर, दत्तात्रय मारकड आदीसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान याठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.राज्यभरातील शारीरिक शिक्षण शिक्षक व जिल्हास्तरावर आलेल्या विविध सुचना,मागण्या व ठरावांचे वाचन अमोल जोशी यांनी केले तर या प्रत्येक ठरावाला संपूर्ण सभागृहाने दोन्ही हात उंच करून एकमताने ठराव मंजूरी दिली.

राज्यस्तरीय महाअधिवेशन मंजूर करण्यात आलेले ठरावपुढीलप्रमाणे-
१) शाळा तेथे शारीरिक शिक्षण शिक्षक असावा.
२) प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महानगरपालिका व विद्यापीठांतर्गत शाळा – कॉलेजात रिक्त झालेल्या शारीरिक शिक्षण शिक्षकांची पदे त्वरित प्राधान्याने भरण्यात यावीत.
३) प्रत्येक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक शिक्षण शिक्षक असावा.
४)शारीरिक शिक्षण शिक्षक यांची व्यावसायिक गुणवत्ता वाढावी, शारीरिक शिक्षण विषयातील नवीन तंत्राची माहिती, योग, प्राणायाम, विविध क्रीडा प्रकारचे आधुनिक प्रशिक्षण, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, गुणदान याविषयी सविस्तर अदयावत माहिती मिळावी यासाठी शासनस्तरावरुन राज्य व जिल्हा स्तरावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे.
५) शारीरिक शिक्षण शिक्षकास अतिरिक्त करण्यात येऊ नये.
६)शारीरिक शिक्षण हा विषय हा केवळ खेळाचा भाग नसून विद्यार्थ्यांच्या समग्र शारीरिक, मानसिक व सामाजिक विकासाचे साधन आहे तसेच शारीरिक शिक्षण शिक्षक हे केवळ क्रीडा स्पर्धा घेणारे कर्मचारी नसून शिक्षण प्रक्रियेतील महत्वाचा घटक आहे म्हणून शारीरिक शिक्षण शिक्षक समायोजित होऊ नये.
७) वाढीव क्रीडा गुण सवलतीच्या प्रस्तावासाठी विद्यार्थ्यांच्या कडून आपले सरकार व महाराष्ट्र शिक्षण मंडळ कडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेण्यात येऊ नये. प्रस्ताव सादरीकरणाची ऑनलाईन प्रक्रिया किचकट असू नये.
८) शालेय क्रीडा स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मानकाचा विचार करून स्पर्धेचा स्तर सुधारण्यात यावा,पंच मानधनात वाढ करण्यात यावी तसेच क्रीडा संकुले अद्ययावत सुविधा व प्रशिक्षक युक्त असावीत.
९) श्री शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार अंतर्गत शासन स्तरावरुन ‘क्रीडा संघटक’ हा पुरस्कार पुन्हा सुरु करण्यात यावा.
१०) शालेय क्रीडा स्पर्धेच्या निवड समिती वर शासकीय प्रतिनिधी,संघटना प्रतिनिधी यांच्या सोबत संबधित खेळातील तज्ञ शारीरिक शिक्षण शिक्षक यांना ही संधी देण्यात यावी.
११) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत घेण्यात येणारे शारीरिक शिक्षण शिक्षकांचे जिल्हा / राज्य स्तरावरील निवासी प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र हे निवड श्रेणी अथवा वरिष्ठ वेतनश्रेणी यासाठी ग्राह्य धरण्यात यावे.
१२) राज्य व राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडू व प्रशिक्षक यांना पुन्हा रेल्वे कन्सेशन सुरु करण्यात यावे.
१३) शारीरिक शिक्षण शिक्षकांना तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर पुरस्कार देऊन गौरव करण्यात यावा.
१४) नवीन राष्ट्रीय शेक्षणिक धोरणामध्ये शारीरिक शिक्षण व क्रीडा या विषयाची प्रभावी अमलबजावणी करण्यात यावी.
१५) निवड श्रेणी साठी एम.पी. एड ची अट शिथिल करून बी.एड प्रमाणे पदव्युत्तर पदवी (एम.ए एज्युकेशन) ग्राह्य धरण्यात यावी.
१६) अंशकालीन बी.पी.एड व एम. पी.एड धारकांना शासन सेवेत प्राधान्याने कायम करण्यात यावे.
१७) आश्रमशाळेत शारीरिक शिक्षक पद निर्माण करून कंत्राटी शारीरिक शिक्षकांना कायम सेवेत घ्यावे .
१८) मुंबई महानगर क्षेत्रातील बीपीएड /एमपीएड धारक शारीरिक शिक्षकांना मुख्याध्यापक पदोन्नती मध्ये घेण्यात यावे.
१९) मुंबई मनपा मधील प्राथमिक विभागातील उच्च विद्याविभूषित शिक्षकांना जिल्हा परिषद शिक्षकांप्रमाणे प्रशासकीय सेवेत पदोन्नती देण्यात यावी .
आदी ठरावांचा समावेश होता.दरम्यान पुढील वर्षाचे अधिवेशन अमरावती येथे घेण्याचा मनोदय समन्वय समितीचे उपाध्यक्ष शिवदत्त ढवळे यांनी जाहिर केले.तर सर्व बाबींचा विचार करून व विविध जिल्ह्यांतून अधिवेशन घेण्यासंदर्भात आलेल्या मागणीचा विचार करून पुढील अधिवेशनाचे ठिकाण जाहीर केले जाईल अशी माहिती समन्वय समितीचे अध्यक्ष विश्वनाथ पाटोळे यांनी जाहिर केले.

error: Content is protected !!