वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका क्रशरवर आपल्या दोन सहकारी कामगारांचा निर्घृण खुन करणारा आरोपी संजय बाबुराव लोखंडे वय ३८ रा. नाशिक याला वैभववाडी पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
क्रशरवर काम करणारा आरोपी संजय लोखंडे याने त्याच्या सोबत काम करणारे धनेश्वर चौधरी वय ६६ व मनिषकुमार सिंग वय ३५ या दोघांचा दिनांक ३० एप्रिल रोजी रात्रौ ११ वाजता धारदार शस्त्त्राने भोसकून निर्घृण खुन केला होता. आरोपी संजय लोखंडे त्याला घटना स्थळावरून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला शुक्रवारी २ मे ओरोस न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याला, ६ मे पर्यत पोलीस कोठाडी सुनावण्यात आली होती. त्याची पोलीस कोठडी संपल्यामुळे त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान आरोपी संजय लोखंडे यांची वैभववाडी पोलीसांनी कसून चौकशी करण्यात आली. त्याने खुनाची कबुली दिली आहे. मयत मुकादम धनेश्वर चौधरी याच्याकडे अगोदर पासूनच आरोपी संजय लोखंडे हा कामाला होता. आरोपी लोखंडे याने मनीषकुमार सिंग याला चौधरी याच्याकडे कामाला आणले होते. दरम्यानच्या काळात मुकादम चौधरी व मनिषकुमार सिंग या दोघांमध्ये जवळीक वाढली होती. त्यामुळे मुकादम चौधरी आपल्याला कामावरून काढून टाकील अशी भीती वाटत होती. बुधवारी रात्री आरोपी संजय लोखंडे याला घेऊन मनिषकुमार सिंग हा खोलीपासून सुमारे 200 फूट आंतरवर घेऊन गेला. त्याठिकाणी बेसावध असलेल्या लोखंडे वर मनीषकुमार सिंग याने त्याच्याकडे असलेल्या धारदार शास्त्राने हल्ला केला.त्याच्या हातातील शस्त्र हिसकावून घेऊन सपासप वार करीत लोखंडे याने सिंग याचा निर्घृन खुन केला. त्यानंतर तो रूमवर आला. त्याठिकाणी चौधरी झोपला होता, त्याने लोखंडे याला पाहून तू जिवंत कसा तुला मारायला मी सिंगल पाठवले होते असे म्हटले, यावर संतप्त झालेल्या लोखंडे यांनी चौधरी च्या पोटावर बसून धारदार शस्त्राने वार केले यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अशी कबुली आरोपी कडून पोलिसांकडे देण्यात आली आहे. खुनामागे काही वेगळे कारण आहे का याचा कसून तपास पोलीस करीत आहेत. मात्र आरोपी सुरुवातीपासून हेच कारण सांगत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.












