कणकवली शहर आणि परिसरातील वीजेच्या प्रलंबित समस्या बाबत कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांचे लक्ष वेधले

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेची लेखी निवेदनाव्दारे तातडीने उपाययोजना करण्याची आग्रही मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहर आणि परिसरातील वीजेच्या प्रलंबित समस्या बाबत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कणकवली येथील कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांचीह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक आणि पदाधिकारी यांनी भेट घेतली. तसेच लेखी निवेदनाद्वारे याबाबत तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात अशी आग्रही मागणी केली आहे.

कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांची ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कणकवली येथील कार्यालयात भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे अनेक समस्या बाबत लक्ष वेधून चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने कणकवली शहरातील परबवाडी, मावूनमळा, शिवाजीनगर, जळकेवाडी येथे कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याबाबत. तसेच कणकवली शहर सहा.अभियंता श्री.पवार हे शहरातील नागरिकांना कोणतीही सेवा नीट देत नाहीत, साधा नागरिकांनी केलेला फोनही उचलत नाहीत तसेच कोणीही कोणत्याही प्रकारची तक्रार केली तर त्याला दाद देत नाहीत अशा प्रकारच्या अनेक नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. ते स्वतः कार्यक्षेत्रावर न जाता वायरमन यांच्यावर कामे सोपवून मोकळे होतात, वायरमन यांनी योग्य प्रकारे कामे केली किंवा नाही याचाही आढावा घेत नाहीत. कणकवली नगरपालिका हद्दीतील वारंवार वीज खंडीत होण्याचे प्रकार होत असतांना कुठच्याही ठिकाणी स्वतः जाऊन पाहणी करत नाहीत. रात्रीचे कर्मचारी डयुटीवर असतात, परंतु त्यांच्या जागी दुसरा कर्मचारी हजर होईपर्यंत ते न थांबता कार्यालय बंद करून निघुन जातात. त्यामुळे वीज ग्राहकांची अत्यंत गैरसोय होते. कोणत्याही प्रकारची तक्रार करावयाची झाल्यास कार्यालय बंद असल्याने वीज बीले भरुनही सेवा मिळत नाही. तरी कणकवली शहर सहाय्यक अभियंता श्री.पवार यांची तातडीने बदली करण्यात यावी तसेच त्यांच्या जागी सहा.अभियंता श्री. मारबोले यांना कणकवली शहर शाखेचा पदभार देण्यात यावा अशी वीज ग्राहकांची मागणी आहे.

तसेच कणकवली शहरातील परबवाडी, शिवाजीनगर, जळकेवाडी, मावूनमळा येथे गेल्या अनेक महिन्यांपासून कमी दाबाचा वीज पुरवठा होत असून त्यामुळे वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. अनेक विद्युत ग्राहकांची उपकरणे यात नादुरूस्त व खराब झालेली असून याबाबत शहराचे विद्युत अभियंता श्रीराम शिंदे यांना फोनवरून वारंवार कल्पना दिली आहे. मात्र त्याबाबत संबंधितांनी आजपर्यंत कधीच प्रत्यक्ष पाहणी केलेली नाही. तरी याबाबत आपण स्वतः लक्ष घालून कार्यवाही करण्याबाबत दि.१०/११/२०२३ रोजी आपल्या कार्यालयाकडे निवेदन सादर केले होते. एवढा कालावधी लोटुनही आपल्या कार्यालयाने याबाबत काहीही कार्यवाही केलेली नाही. तरी तातडीने कार्यवाही करून ग्राहकांची होणारी गैरसोय दूर करावी.

कणकवली, देवगड, मालवण या ठिकाणी जे डिपी आहेत ते अनेक ठिकाणी उघड्या स्थितीत आहेत. त्यांना दरवाजा नाहीत. तरी एखाद्या मोठा अपघात होण्याअगोदर डिपींना दरवाजे बसविण्यात यावेत.कणकवली शहरासाठी नवीन फीडर मागील डीपीडीसी २०२४ च्या सभेमध्ये मंजूर झालेले असूनही त्याबाबत वारंवार पाठपुरावा करुनही अद्याप त्याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. सदर फीडरसाठी आलेला निधी परत गेल्यास ही बाब पालकमंत्री नितेश राणे यांच्या निदर्शनास आणुन देण्यात येईल.

कणकवली शहरातील शिवाजीनगर येथील शाळा नं.५ जवळील ट्रान्सफार्मर वारंवार नादुरुस्त होत असल्याने व सदोष असल्याने तो बंद पडल्यानंतर शहराच्या ग्रामीण भागात अंधार होतो. तरी त्या ठिकाणी लवकरात लवकर नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यात यावा. कणकवली शहरातील विद्युत वाहिन्या गेली ५० ते ६० वर्ष बदललेल्या नाहीत. त्या वारंवार तुटत असतात. तसेच सदर भागातील विद्युत खांबही फार जुने झाले असून केव्हाही अपघात होऊ शकतो. तरी याचा सर्वे करून सदर खांब व विद्युत वाहिन्या तातडीने येत्या पावसाळयापूर्वीच बदलून घ्याव्यात. त्याचबरोबर पावसाळयापूर्वी शहरातील विद्युत वाहिन्यांवरील वाढलेली झाडे तोडण्यात यावीत.
तसेच विद्युत मीटर बदलतांना विद्युत ग्राहकांची परवानगी घेऊनच बदलण्यात यावेत.

 निवेदनातील सर्व मुद्द्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी कार्यकारी अभियंता सौरभ माळी सकारात्मक प्रतिसाद देत पावसाळ्यापूर्वी समस्या मार्गी लावण्याची ग्वाही शिष्टमंडळाला दिली.

  याप्रसंगी कार्यकारी अभियंता सौरभ माळी, उपकार्यकारी अभियंता विलास बगडे, ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभाग अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हा खजिनदार हनिफभाई पीरखान, कणकवली तालुका अध्यक्ष मंगेश चव्हाण, सचिव सदाशिव राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
error: Content is protected !!