आमदार नितेश राणेंचा सामाजिक उपक्रम
केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या वाढदिवशी करणार शुभारंभ
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघात ग्रामीण भागातील सर्व गरजू मुलींना स्वखर्चाने सायकल प्रदान करणार असल्याची घोषणा आमदार नितेश राणे यांनी केली.केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त 10 एप्रिल रोजी आमदार नितेश राणे यांनी हा सामाजिक उपक्रम सुरू करत असल्याचे सांगितले. पहिल्या टप्यात शाळेतील एकूण 379 मुलींना मोफत सायकल वाटप करण्यात येणार आहे. त्यापैकी प्रथम 100 विद्यार्थिनींना त्यांच्या शाळेच्या माध्यमातून सायकल वाटप करण्यात येणार आहे.जेव्हा ह्या विद्यार्थिनी शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडतील तेव्हा ती सायकल शाळेत जमा केली जाईल व त्याचा लाभ अन्य गरजू मुलींना दिला जाईल असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले. यासंदर्भातील गरजू विद्यार्थिनींची आकडेवारी अधिकृतपणे शिक्षण विभागाकडून उपलब्ध झाल्याचे आमदार राणे म्हणाले.