मालवण – बेळणे मार्गावर विरण येथील दुर्घटना
चौके (प्रतिनिधी) : मालवण बेळणे मुख्य रस्त्यावरील विरण बाजारपेठेतील पोईप गावाला जोडणाऱ्या पुलाची संरक्षक भिंत आणि भराव सध्याच्या अतिवृष्टीमुळे कोसळून सदर रस्ता अवजड वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. ही दुर्घटना सकाळी अकरा वाजता घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच या रस्त्याची रहदारी सुरू राहिल्यास संपूर्ण रस्ता वाहतुकीस बंद होणार असल्याची भीती माजी जि. प. बांधकाम सभापती श्री अनिल कांदळकर यांनी व्यक्त केली.
श्री कांदळकर यांच्या म्हणण्यानुसार सदर पुलाचे काम करून फक्त पाच वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि असे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अशा निकृष्ट दर्जाचा कामाचा हा ज्वलंत नमुना आज आम्हाला पाहावा लागतो हे आमचे दुर्दैव आहे रस्ता बंद झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटणार आहे तसेच मालवण ते कणकवली असा हा रस्ता असल्याने या रस्त्याने ये जा करणाऱ्या लोकांना खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे . तसेच विरण बाजारपेठ ही फार जुनी बाजारपेठ असून या बाजारपेठेवर अवलंबून दशक्रोशीतील लोक आहेत आणि त्यामुळे डॉक्टर, रेशन, शाळा ,कॉलेज ,शासकीय कार्यालय तसेच जीवनावश्यक गोष्टींसाठी ये जा करण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नसल्याने व्यापाऱ्यांचे तसेच ग्राहकांचे ग्रामस्थांचे फार मोठे हाल होणार आहेत . सुदैवाने दिवसाचा प्रकार घडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. तरी सा. बा. विभागाने तात्काळ पर्याय उपलब्ध करुन द्यावा, व अशा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर तसेच पाहणी करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे .
यावेळी घटना स्थळी युवासेना उपजिल्हा प्रमुख पंकज वर्दम , शिवसेना शाखाप्रमुख नारायण राणे विलास पांजरी, रवी कूशे,संदिप कुशे,बांबू वाडकर ,यश पांजरी ,राजू तिरोडकर ,अमित कुशे ,पप्पू आंबेडकर ,पोलिस पाटील विरण निनाद माडये, पोईप पोलिस पाटील अविनाश जाधव , बबलू वेंगुर्लेकर ,प्रसाद जाधव, तसेच मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते











