रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे ग्रामस्थांचा आरोप
संबधीत कामाची व ठेकेदाराची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी
खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील मुंबई – गोवा महामार्ग ते थेट खारेपाटण बाजारपेठेत येणार मुख्य रस्त्याची पहिल्याच पावसात वाट लागली असून रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले असून सर्वत्र पावसाची माती साचली आहे.तर पावसाचे पाणी नाल्यातून न जाता थेट रस्त्यावरून जात असल्यामुळे नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.दरम्यान सदर रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असून संबधीत झालेल्या कामाची व काम करणाऱ्या ठेकदाराची सखोल चौकशी करून त्याचेवर कार्यवाही करण्याची जोरदार मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की,खारेपाटण गावात येणारा मुख्य रस्ता हा अतिशय खराब झाला होता.तर ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती.म्हणून हा रस्ता करण्याची मागणी येथील ग्रामस्थांकडून वारंवार केली जात होती.अखेर हा रस्ता माजी सरपंच रमाकांत राऊत व स्थानिक ग्रामपंचायतीच्या प्रयत्नाने अर्थसंकल्पिय बजेट सन २०२३ -२४ मधून सुमारे ३२ लाख रुपये एवढा मोठा निधी या रस्त्यासाठी मंजूर करण्यात आला होता.तर या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा ठेका जिल्ह्यातीलच ठेकेदार निखिल घेवारे यांनी घेतला होता.व२ जानेवारी २०२५ रोजी या रस्त्याचे डांबरीकरन व खडीकरण करणे तसेच संरक्षक भित बांधणे आणि रस्त्याचे भराव टाकून उंचिकरण करणे व मोरी बसविणे या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता.
मात्र जानेवारी २०२५ मध्ये शुभारंभ करण्यात आलेल्या कामाला प्रत्यक्षात सुरवात मात्र १० मे २०२५ नंतर म्हणजे तब्बल ४ महिन्या नंतर करण्यात आली.उशिरा सुरू केलेल्या या कामाचा परिणाम असा झाला की,ऐन भर पावसात या रस्त्याचे डांबरीक्ररण करण्याचा घाट संबधीत कॉन्ट्रॅक्टर ने घातला.आणि १५ मे नंतर सुरू झालेला अवकाळी पावसाचा फटका या रस्त्याच्या कामाला बसला.मात्र कॉन्ट्रॅक्टर ने कामाचा कोणताही दर्जा न ठेवता घाई गडबडीत काम पूर्ण करण्याचा सोपस्कार पार पडला.ठेकेदाराच्या या बेजबाबदर पणे काम करण्याच्या प्रवृत्तीमुळे येथील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असून एवढा ३२ लाख रुपयाचा रस्त्यासाठी मंजूर झालेला निधी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पावसाच्या पाण्यात फुकट घालवला असल्याचा आरोप आता ग्रामस्थांकडून केला जात आहे.
सद्या या रस्त्याची एवढी भयानक अवस्था झाली असून ठेकेदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाण्यासाठी नाला ठेवला नसल्यामुळे सर्व पाणी रस्त्यावर साचून वाहत आहे.तर या रस्त्याला लागून मोठा नाला आहे. यामधून पावसाचे प्रचंड पाणी वाहत असते.मात्र संबधीत ठेकेदाराने या नाल्यात संपूर्ण मातीचा ढिगारा टाकल्याने पाणी जायला मार्ग नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.परिणामी या नाल्याचे संरक्षक भित तुटून सर्व पाणी बाजूच्या शेतकरी बांधवांच्या शेतात जात आहे.रस्त्याचे मोरी घालून रस्त्याची भराव टाकून उंची वाढविणे व रुंदीकरण करणे असे काम होते.मात्र प्रत्यक्षात असे काम झालेले दिसत नाही.
सदर रस्ता खारेपाटण हायस्कूल ते खारेपाटण एस टी बस स्थानक पर्यंत खडीकरण व डांबरीकरण करण्यात आला असून पहिल्याच पावसात रस्त्यावर ठिकठिकाणी आताच खड्डे पडले असून या रस्त्याची पूर्णतः दुरवस्था झालेली आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करन्यात येत असून संबधीत रस्ता कामाची व संबधीत काम करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करून असे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराना काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी खारेपाटण ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.












