मुंबई – गोवा महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष
संरक्षक लोखंडी जाळी बसविण्याची ग्रामस्थांची मागणी
खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महा मार्गावरील खारेपाटण येथील चेक पोस्ट समोरील दरड सद्या धोकादायक स्थितीत या दरडीला लागुणच मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग जात असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाना धोका निर्माण झाला असून भविष्यात मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जात असून जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरच खारेपाटण महामर्गाची ही अवस्था असेल तर अन्य ठिकाणी काय असेल ? असा सवाल ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे. महामार्गावरील खारेपाटण चेकपोस्ट समोरील ही दरड गेल्यावर्षी देखील पावसामुळे कोसळली होती.तर यावेळी देखील पहिल्याच पावसात दरडीचा थोडा थोडा भाग कोसळत आहे सुमारे १५० ते २०० फूट उंच असलेली ही दरड मोठी पर्जन्य वृष्टी झाल्यास कधीही कोसळू शकते तरी महामार्ग प्राधिकरणाने याकडे तातडीने लक्ष देऊन सुरक्षिततेचा पर्याय म्हणून संबधीत दरडीला लोखंडी जाळी बसविण्यात यावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.
तसेच या महामार्गाला लागून सर्व्हिस रोड देखील नसल्यामुळे चिंचवली गाव तसेच खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या वाहनांना तसेच रस्त्याने जाणाऱ्या नागरिक पादचारी वर्गाच्या जीवाला यामुळे धोका निर्माण झाला आहे.मुळात ही दरड रस्ता कामत कटिंग करताना दोन किंवा तीन टप्पे न ठेवता सरळ उभी सुळ कटिंग करण्यात आल्यामुळे या दरडीचे धोकादायक काळे दगड व माती थेट महामार्गावर येत आहेत.
तर या धोकादायक दरडीमुळे भविष्यात एखादा मोठा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण ? असा सवाल ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे.तरी महामार्ग प्राधिकरणाने संबधीत समस्येकडे गभिर्याने लक्ष देऊन या धोकादायक दरडीवर सुरक्षेच्या दृष्टीने कायमची तातडीने उपाय योजना करावी.












