नाडण मधील बेपत्ता वृद्धाचा मृतदेह गटारात सापडला

देवगड (प्रतिनिधी) : नाडण पुजारेवाडी येथील बेपत्ता झालेले आत्माराम विठोबा मोंडे (78) यांचा मृतदेह वाडा पुलानजिक गटारात रविवारी दुपारी 3.45 वा. सुमारास आढळून आला आहे. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, नाडण पुजारेवाडी येथील आत्माराम विठोबा मोंडे हे 6 जून रोजी पहाटे 6 वा. च्या सुमारास घरातून कोणालाही न सांगता निघून गेले.ते घरी परत आले नाहीत व शोधाशोध करूनही ते सापडले नाहीत.ते बेपत्ता झाल्याची फिर्याद त्यांचा मुलगा संदेश याने देवगड पोलिस स्थानकात दिली होती. दरम्यान रविवारी वाडा आंबेडकर चौक येथील पुलाजवळील गटारात तेथील ग्रामस्थ देवेंद्र पुरूषोत्तम वाडेकर यांना पुरूष जातीचा मृतदेह निदर्शनास आला. त्यांनी घटनेची माहिती वाडा पोलिस पाटील महेंद्र मांजरेकर यांना दिली. देवगड पोलिस स्टेशनला माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जात पंचनामा केला. 6 जुन रोजी बेपत्ता झालेले आत्माराम मोंडे यांचा मुलगा संदेश याला घटनास्थळी बोलावून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली.

आत्माराम मोंडे हे मनोरूग्ण होते. त्यांची मानसिक स्थिती बिघडत असल्याने त्यांच्यावर रत्नागिरी मनोरूग्णालयामार्फत उपचार सुरू होते, अशी माहिती त्यांचा मुलगा संदेश यांने पोलिसांना फिर्यादीतून दिली आहे. दरम्यान देवगड ग्रामीण रूग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. घटनेचा तपास पोलीस हवालदार आशिष कदम करीत आहेत. आत्माराम मोंडे यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे व विवाहित मुली असा परिवार आहे.

error: Content is protected !!