कलमठ मधील घरफोडी करणारा हिस्ट्री सीटर चोर पोलिसांच्या जाळ्यात

एलसीबी आणि कणकवली पोलिसांची दमदार कामगिरी

अथक मेहनतीने गोकर्ण कर्नाटक येथे आवळल्या मुसक्या

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : कणकवली तालुक्यातील कलमठ येथे घरफोडी करून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम मिळून 1 लाख 73 हजारांचा मुद्देमाल चोरणारा सराईत चोरटा सचिन राजू माने उर्फ लखन अशोक कुलकर्णी ( रा. पंढरपूर, जिल्हा सोलापूर ) याला एलसीबी सिंधुदुर्ग आणि कणकवली पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने गोकर्ण कर्नाटक येथून 14 जून रोजी सायंकाळी अत्यंत शिताफीने चतुर्भुज केले आहे. कलमठ बिडयेवाडी येथे 2 जून रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कुलूपबंद असलेल्या चार बंगल्यात घरफोडी झाली होती. दरम्यान ही चोरी करतानाचे फुटेज सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले होते. संजय सुभाष सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 1 लाख 73 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल चोराने लंपास केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या नेतृत्वाखाली कणकवली पोलीस ठाण्यातील पीएसआय अनिल हाडळ , एलसीबी पीएसआय आर बी शेळके, हवालदार गंगावणे,हवालदार देसाई ,महिला पोलीस कॉन्स्टेबल नांदोस्कर यांच्या पथकाने हे मिशन फत्ते केले आहे.
कलमठ घरफोडी गुन्ह्याच्या तपासावेळी, घटनास्थळास दिलेली भेट आणि त्यादरम्यान मिळालेले संशयित आरोपी याचे सीसीटीव्ही फुटेज, संशयित आरोपीचा घटनास्थळावरील वावर, गुन्हा करण्याची पद्धत आणि अभिलेख या सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास करून सदरचा गुन्हा रेकॉर्ड वरील आरोपी सचिन राजु माने उर्फ लखन अशोक कुलकर्णी ( रा. पंढरपूर जिल्हा सोलापूर ) याने हा गुन्हा केला असावा हा अंदाज वर्तवून त्या दृष्टीने पुढे तपास एलसीबी आणि कणकवली पोलिसांच्या पथकाने सुरू केला होता. आरोपी सचिन माने याची गोपनीय माहिती पोलिसांनी प्राप्त केली. तसेच त्याचे मित्र, व मैत्रिणी, जवळचे नातेवाईक याविषयी इत्यंभूत माहिती संकलित केली. त्यात आरोपी सचिन राजु माने उर्फ लखन अशोक कुलकर्णी याचाच कलमठ चोरीतसहभाग निश्चित होत असले बाबत दिसून आले. त्या दृष्टीने समांतर तपास सुरू असताना आरोपी सचिन याचे वास्तव्य गोकर्ण, राज्य- कर्नाटक या ठिकाणी असले बाबत तांत्रिक विश्लेषणाद्वारे निष्पन्न झाले. लागलीच एलसीबी आणि कणकवली पोलिसांच्या पथकाने 14 जून रोजी आरोपी सचिन माने याला गोकर्ण, राज्य – कर्नाटक या ठिकाणाहून शीताफिने ताब्यात घेतले. त्याचेकडे वरील अ- उघड गुन्ह्याचे संबंधाने चौकशी करता त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली असून गुन्हा उघड झालेला आहे. आरोपी सचिन माने याला कणकवली पोलीस ठाण्यात आणले असून त्याच्या रीतसर अटकेची कारवाई सुरू आहे.

error: Content is protected !!