खारेपाटण येथे २३ जून रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन
खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत यांचे सौजन्य
खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मस्त्य व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २३ जून २०२५ रोजी खारेपाटण येथे भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक व खारेपाटण गावचे माजी सरपंच तसेच भाजप पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमाकांत राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. खारेपाटण हायस्कूल येथील सभागृहात दि. २३ जून रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.३० या वेळात संपन्न होणाऱ्या या शिबिरात मुंबई येथील नामांकित डॉक्टर तसेच अथायु हॉस्पिटल केअर सेंटर कोल्हापूर येथील तज्ञ डॉक्टर याबरोबरच कणकवली येथील विवेकानंद नेत्र रुग्णालय चे डॉक्टर व खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉक्टर आणि खारेपाटण डॉक्टर क्लब चे डॉक्टर उपस्थित राहून शिबिरातील रुग्णांची तपासणी करणार आहेत.
या महाआरोग्य शिबिरात डोळ्याची तपासणी व मधुमेह, रक्तदाब तपासणी तसेच रक्ताच्या विविध तपासण्या करण्यात येणार आहेत याबरोबरच किशोरवयीन मुलींना मासिक धर्म विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहेत तसेच महिलांच्या स्तनाचे कॅन्सर व गर्भ पिशवी चे कॅन्सर याबाबत देखील तपासण्या करण्यात येणार आहेत. तसेच या शिबिरात मुतखडा,प्रोस्टेट ग्रंथींचे आजार, लघवीचे आजार, हाडांचे विकार यांच्या देखील तपासण्यात व त्याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिर करीता सकल मराठा समाज खारेपाटण या संघटनेचे देखील सहकार्य लाभणार आहे. तरी या महाआरोग्य शिबिराचा खारेपाटण दशक्रोशितील नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक श्री रमाकांत राऊत यांनी केले आहे.












