नगरपंचायतीच्या माध्यमातून खेळाडूंना सोईसुविधा उपलब्ध करून देणार ; समीर नलावडे
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बॅटमिंटन क्लब आणि के.एन.के. स्मॅशर्स कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली न. पं. च्या स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये सिंधुदुर्ग बॅटमिंटन स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी न. पं. चे बांधकाम सभापती ॲड. विराज भोसले, नगरसेवक अबिद नाईक, नगरसेविका मेघा गांगण, जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, रोटरी क्लबच्या अध्यक्षा वर्षा बांदेकर, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष तथा उद्योजक दीपक बेलवलकर, माजी नगरसेवक अजय गांगण, किशोर राणे, विलास कोरगावकर, रवींद्र नानचे, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे, सिंधुरत्न बॅटमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष हमीद शेख, खजिनदार क्षितीज परब, केतन आजगावकर, समद शेख, आनंद पोरे, सुशील पारकर, सिद्धेश तळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले, कणकवली शहरातील खेळाडूंना बॅडमिंटन व कब्बडी सराव करता यावा यासाठी नगरपंचायतच्या माध्यमातून स्पोर्टस् कॉम्प्लेक्स उभारले आहे. तसेच या स्पोर्टस कॉम्प्लेक्समुळे नवीन खेळाडू घडतील. या परिसरात स्विमिंग पूलसह अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
तरुणासह नागरिकांनीही आरोग्य चांगले राहावे, यासाठी नियमित कोणताही खेळ खेळला पाहिजे. शहरातील तरुण पिढी विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करीत आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे. शहरातील खेळाडूंना सोयीसुधिवा नगरपंचायतच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच कणकवलीच्या विकासासाठी सर्व नगरसेवक व न. पं. ची टीम चांगले काम करीत आहे, असे कौतुकोद्गार श्री. नलावडे यांनी काढले. आरंभी के. एन. के स्मैशर्मतर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन किशोर राणे यांनी केले. बॅटमिंटन स्पर्धेत सिंधुदुर्गातील बॅटमिंटनपटू मोठ्या संख्येने सहभागी झाले असून ही स्पर्धा रविवारपर्यंत चालणार आहेत. यावेळी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मोठ्या संख्येने क्रीडा रसिक उपस्थित होते.