सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिद्धिविनायक बिडवलकर ( रा. चेंदवण ) याचे अपहरण करून त्याला अमानुष मारहाण करून त्याचा खून करून मृतदेह जाळून मृतदेहाची राख नदीपात्रात टाकून पुरावा नष्ट केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी सर्वेश भास्कर केरकर याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश विद्या देशमुख यांनी नामंजूर केला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केल्यामुळे आरोपी सर्वेश चा जेलमुक्काम वाढला आहे. सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर ( रा.चेंदवन ) याचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला होता. बिडवलकर याचा मृतदेह स्मशानात जाळून मृतदेहाची राख नदीपात्रात सोडून खुनाचा पुरावा नष्ट करण्यात आला होता. या गुन्ह्यातील सहआरोपी सर्वेश भास्कर केरकर याने जामिनावर मुक्तता होण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज सादर केला होता. जामीन अर्जाला जोरदार हरकत घेत सरकारी वकील रुपेश देसाई यांनी पुढील मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणले.सदर गुन्हा आजीवन कारावास अथवा त्याहून जास्त शिक्षेचा असून अद्याप गुन्ह्याचा तपास सुरू आहे. आरोपी सर्वेश याने मयत बिडवलकर याला ठार मारण्याच्या उद्देशाने आपल्या साथीदारांसाह त्याच्या घरातून उचलून कारमधून त्याचे अपहरण केले.बिडवलकर याला ठार मारून त्याचे प्रेत जाळून राख नदीपात्रात टाकून पुरावा नष्ट केला. या गुन्ह्यातील फिर्यादी आणि साक्षीदार हे मूकबधिर असून आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत. जामिनावर सुटल्यास आरोपी फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर दबाव आणू शकतो. आरोपीने थंड डोक्याने नियोजन करून अत्यंत क्रूरपणे गंभीर गुन्हा करून पुरावा नष्ट केला आहे. जामिनावर सुटल्यास तो पुन्हा असाच गुन्हा करू शकतो.आरोपीची कुडाळ शहरात वचक असून तो साक्षीदारांना प्रलोभन देऊन सत्य संगण्यापासून परावृत्त करू शकतो. मयताच्या प्रेताची विल्हेवाट लावताना वापरलेली एक गाडी जप्त करायची आहे. आरोपी बिडवलकर विरोधात कुडाळ आणि संगमेश्वर पोलीस ठाण्यात अन्य गुन्हे दाखल आहेत. मयताच्या मामीने दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल झाला असून आरोपीला जामीन मिळाल्यास तो फिर्यादी आणि साक्षीदार याना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करू शकतो.आरोपीला जामीन मिळाल्यास कायद्याचे भय राहणार नाही, कायद्याचे भय अबाधित राहण्याकरिता आरोपी सर्वेश केरकर चा जामीन नामंजूर करावा असा युक्तिवाद सरकारी वकील रुपेश देसाई यांनी केला. सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश श्रीमती देशमुख यांनी आरोपी सर्वेश केरकर चा जामीन अर्ज फेटाळला.












