कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट मध्ये सोमवार 15 जून रोजी सापळे पुलाजवळ झालेल्या मारहाणीत रोख रक्कम, सोन्याचे दागिनेचोरीचा तसेच मारहाण केल्याचा परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याघटनेबाबत समीर सदानंद सामंत आणि संजय आग्रे यांनी परस्परविरोधात फिर्याद दिली आहे. याबाबत संजय आग्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार समीर सामंत याने सापळे पूलाजवळ पूल बांधकामाची आग्रे पाहणी करत असताना समीर सामंत याने अरुण सामंत यांच्या कारमधून तिथे येऊन आग्रे यांना याही कामात पैसे खायचे आहेत काय असे विचारले, तेव्हा आग्रे यांनी समीर याला तू आम्हाला विचारणारा कोण ? असा सवाल केल्याच्या रागातून समीर हा कारमधून उतरून आग्रे यांना शिवीगाळ करून एकेकाला बघून घेईन ठार मारेन अशी धमकी दिली. तेव्हा आग्रे यांनी समीरला तू गावाची बदनामी फेसबुक वर करू नको असे सांगितले. त्यानंतर समीर ने रागाने आग्रे यांच्या अंगावर धावत जाऊन त्यांच्या गळ्याला धरून ओढून धक्काबुक्की केली. तसेच हाताच्या ठोशाने मारहाण केली. तसेच आग्रे यांच्या गळ्यातील 2 तोळ्याची सोन्याची चैन हिसकावून घेऊन गेला अशी फिर्याद आग्रे यांनी पोलिसांत दिली आहे. त्यानुसार समीर सामंत याच्यावर बिएनएस चे कलम 115 (2), 314, 351 (3),352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर समीर सदानंद सामंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार समीर सामंत 15 जून रोजी सकाळी आपला चुलत भाऊ अरुण सामंत यांच्या कारमधून कणकवली च्या दिशेने जात असताना सापळे पुलाजवळ संजय आग्रे यांनी सामंतांची गाडी थांबवली. कार थांबताच संजय आग्रे, मिथिल सावंत, समीर भालेकर, प्रकाश शितोळे, राजन नानचे, राजेश कोथिंबीरे, विनायक सावंत, विजय लाड, पवन भोगले यांनी कारला गराडा घातला. फोंडाघाट ग्रामपंचायत च्या गैरकारभाराविरुद्ध समीर यांनी केलेल्या तक्रारींचा राग मनात ठेवून वरील सर्वांनी मला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.मिथिल सावंत, समीर भालेकर यांनी कारचा दरवाजा उघडून समीर यांना कारच्या बाहेर ओढले, आणि हाताने मारहाण केली. समीर सामंत यांच्या अंगावरील शर्ट फाडला. या मारहाणीत समीर सामंत यांच्या हातातील 28 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी, आणि रोख रक्कम 22 हजार खाली पडली. झालेल्या झटापटीत हा ऐवज वरीलपैकी कोणीतरी नेल्याचा समीर सामंत यांनी संशय व्यक्त केला आहे. समीर सामंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरील सर्वांविरोधात बी एन एस च्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास कणकवली पोलीस करत आहेत.
फोंडाघाट मध्ये मारामारी ; परस्परविरोधी गुन्हा दाखल












