वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा सकाळ सत्रात भरविण्याची पालकांच्या मागणीला जोर

शिक्षक संघटनांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्याकडे शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याबाबत निवेदनाद्वारे केलीय मागणी

वैभववाडी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढत असलेल्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यात याव्यात, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी शालेय प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, यंदाच्या उन्हाळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात विक्रमी तापमानाची नोंद झाली असून जून महिन्याच्या मध्यापर्यंतही उष्णतेची तीव्रता कायम आहे. पावसाचे आगमन लांबल्याने उष्णतेचा कालावधी अधिक वाढला आहे. त्यामुळे लहान विद्यार्थ्यांमध्ये उष्माघात, डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा यांसारख्या उष्णताजन्य आजारांचा धोका वाढला आहे.अनेक शाळांमध्ये थंड पिण्याचे पाणी, सावलीची व्यवस्था तसेच उष्णतेपासून संरक्षणाची पुरेशी साधने उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पालक, शिक्षक व विविध संघटनांकडून शाळा सकाळच्या सत्रात घेण्याची मागणी जोर धरत आहे.सर्व माध्यमिक शाळांचे वेळापत्रक सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत ठेवण्याचा तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी पालक व शिक्षक वर्गातून होत आहे.

error: Content is protected !!