सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निकिता एडवे यांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती

तीन दशकांच्या सेवेनंतर पीएसआय पदाचा मान; सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

ओरोस (प्रतिनिधी) : महिला अत्याचार निवारण कक्षामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असणाऱ्या निकिता बाळकृष्ण एडवे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती करण्यात आली आहे. तीस वर्षाहून अधिक काळ जनसेवा केल्यानंतर त्यांना बढती देण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे.

निकिता एडवे यांनी पोलीस दलात तीन दशकांहून अधिक काळ प्रामाणिकपणे आणि कर्तव्यदक्षतेने सेवा बजावली आहे. आपल्या सेवाकाळात त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत राहून अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांच्या तपासात सक्रिय योगदान दिले आहे. तसेच गरजू आणि पीडित नागरिकांना वेळोवेळी मदतीचा हात देत लोकाभिमुख अधिकारी म्हणूनही त्यांनी ओळख निर्माण केली आहे. विशेषतः कणकवली तालुक्यातील त्यांच्या सेवाकाळाची नागरिक आजही आदराने आठवण काढतात. नागरिकांशी संवाद साधण्याची शैली, संवेदनशील प्रश्न हाताळण्याची क्षमता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी यामुळे त्यांनी पोलीस दलात एक वेगळी छाप निर्माण केली आहे.

सध्या त्या महिला अत्याचार निवारण कक्ष, ओरोस येथे कार्यरत असून यापूर्वी त्यांनी कणकवली, बांदा, वैभववाडी, ओरोस तसेच पोलीस मुख्यालय येथे उत्कृष्ट सेवा बजावली आहे. त्यांच्या या पदोन्नतीमुळे पोलीस दलातील सहकारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!