पीएमश्री श्री महालक्ष्मी विद्यामंदिर कोकिसरे शाळेत प्रवेशोत्सव साजरा
वैभववाडी (प्रतिनिधी) : शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थी, शिक्षक, पालक,ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी या घटकांना फार महत्त्व आहे. गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षणासाठी या सर्वांनी समन्वयाने काम करून वैभववाडी तालुका शिक्षणातअग्रेसर ठेवूया, असे आवाहन सभापती सिद्धेश रावराणे यांनी केले. मुलांतील “माणूस” घडविणारी शाळा हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या पीएमश्री श्री महालक्ष्मी विद्यामंदिर कोकिसरे शाळेत प्रवेशोत्सवानिमित्त संपन्न झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.शिक्षणानेच शहाणपण येते. आज विविध क्षेत्रात असलेल्या नोकरी, व्यवसायाच्या संधी या केवळ दर्जेदार शिक्षणानेच मिळविता येऊ शकतात. त्यासाठी प्रत्येकाने शिक्षणाभिमुख बनले पाहिजे, असे ते म्हणाले. शाळा राबवित असलेल्या विविध उपक्रमांबाबत त्यांनी शाळेचे विशेष कौतुक केले.यावेळी नवागतांचे स्वागत, सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वितरण पाठ्यपुस्तक वितरण, ओळखपत्र वितरण व गावातील प्रतिष्ठित नागरिक अरविंद कानिटकर यांनी दिलेल्या शैक्षणिक साहित्याचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कोकिसरेचे प्रशासक प्रदीप नारकर, माजी सरपंच दत्ताराम सावंत, केंद्रप्रमुख नितीन कदम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश बडमे, उपाध्यक्ष आरुषी काजरेकर, ग्रामपंचायत अधिकारी संभाजी वाघमोडे, विशेष शिक्षक मंगेश चव्हाण, बंधू वळंजू, बाळा वाडेकर, दिलीपकुमार पवार, देवजी पालकर, आकांक्षा जाधव, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रफुल्ल जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन शिक्षक अमोल येनगे यांनी केले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, सर्व पालक, शिक्षक व ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.











