फोंडाघाट (प्रतिनिधी) : भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या Centre for Cultural Resources and Training (CCRT), नवी दिल्ली तर्फे दिली जाणारी प्रतिष्ठित जूनियर फेलोशिप यंदा तेजस्विनी चव्हाण-आचरेकर यांना २५जून रोजी जाहीर झाली आहे. कला, संस्कृती आणि परंपरांच्या संवर्धनासाठी तसेच संशोधनात्मक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही फेलोशिप दिली जाते.
देशभरातून प्राप्त झालेल्या अर्जांमधून तज्ज्ञ समितीद्वारे निवड प्रक्रिया पार पडते. त्यामध्ये तेजस्विनी चव्हाण-आचरेकर यांच्या संशोधन प्रस्तावाची निवड करण्यात आली. या फेलोशिपच्या माध्यमातून त्या आपल्या निवडलेल्या विषयावर सखोल संशोधन करणार आहेत. भारतीय सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि कलाक्षेत्राच्या जतन व संवर्धनासाठी या संशोधनाचा उपयोग होणार आहे.
तेजस्विनी चव्हाण-आचरेकर या गेली अनेक वर्षे कलाक्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध सांस्कृतिक उपक्रम, सादरीकरणे आणि संशोधनात्मक कामांद्वारे आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण कलासाधना, अभ्यासू वृत्ती आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांची या प्रतिष्ठित फेलोशिपसाठी निवड करण्यात आली आहे.
या यशाबद्दल कला, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, गुरुजन, सहकारी, मित्रपरिवार तसेच हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या फेलोशिपमुळे त्यांच्या संशोधन कार्याला नवी दिशा मिळणार असून भारतीय सांस्कृतिक परंपरांच्या अभ्यासात मोलाची भर पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.












