खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेचे उच्च श्रेणी केंद्र मुख्याध्यापक प्रदीप दत्ताराम श्रावणकर हे लवकरच या जून महिन्यात सेवा निवृत्ती होणार असल्या कारणाने ग्रामपंचायत कार्यालय खारेपाटण यांच्या वतीने त्याचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ कार्यक्रम नुकताच सरपंच महेंद्र गुरव यांच्या शुभ हस्ते ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाला.

या कार्यक्रमाला जि.प. सदस्य प्राची ईसवलकर, पं.स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे, खारेपाटण केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याबरोबरच माजी उपसरपंच इस्माईल मुकादम, बूथ अध्यक्ष शेखर कांबळी, ग्रा.पं.सदस्य सुधाकर ढेकणे, जयदीप देसाई, किरण कर्ले, क्षितिजा धुमाळे, मनाली होणाळे, दक्षता सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ मधून सेवानिवृत्त होणारे शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांचा खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच महेंद्र गुरव यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी आपल्या सत्काराला उत्तर देताना प्रदीप श्रावणकर म्हणाले “खारेपाटण केंद्र शाळेतील विद्यार्थी पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच येथील ग्रामस्थानी मला माझ्या नोकरीच्या काळात जे भरभरून प्रेम केले. माझ्या कामात मला सहकार्य केले.व शाळे बरोबरच गावचे नाव उज्ज्वल करण्यासाठी मदत केली.त्यांचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. या शाळेने व गावाने मला मोठे केले. हे त्यांचे ऋण माझ्या कायम आठवणीत राहतील.खारेपाटण गावची ग्रामपंचायत येथील सर्व शाळांना नेहमीच मदत करते.त्यामुळे तुम्ही करत असलेले चांगले कार्यच तुम्हाला मोठे करत असते.”असे भावपूर्ण उदगार सत्काराला उत्तर देताना प्रदीप श्रावणकर यांनी काढले.

तसेच उपस्थित मान्यवरांनी प्रदीप श्रावणकर यांना दि.३० जून २०२६ रोजी सेवानिवृत्ती होणार असल्याबाबत आगावू शुभेच्छा दिल्या. यावेळी सरपंच महेंद्र गुरव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “खारेपाटण जि.प.प्राथमिक मराठी केंद्र शाळेसाठी व आमच्या गावसाठी लाभलेले शिक्षक प्रदीप श्रावणकर सर हे आमचे भाग्य असून मुलांच्या शैक्षणिक प्रगती बरोबरच गावातील ग्रामस्थांना एकत्र घेऊन शाळेचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना तोड नाही.व असा शिक्षक पुन्हा होणे नाही.तेव्हा आपली आता सर्वांची जबाबदारी आहे. श्रावणकर सरांनी निर्माण केलेले वैभव टिकवून ठेवणे काळाची गरज आहे. असे सांगितले. या कार्यक्रमाला खारेपाटण ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर ग्रामपंचायतीच्या वतीने सेवानिवृत्ती निमित्त आपला सत्कार कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले.












