वैभववाडी (प्रतिनिधी) : तळेरे–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करूळ चेकनाक्यावर वैभववाडी पोलिसांनी खाजगी आराम बसमधून गोवा बनावटीची सुमारे ३६ हजार रुपये किमतीची दारू जप्त केली. ही कारवाई सोमवारी मध्यरात्री २.४० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी बसचा क्लिनर सचिन बाबासाहेब इरकर (वय २३, रा. कात्रज, पुणे) याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करूळ चेकनाक्यावर ड्युटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड व हरीश जायभाय हे नेहमीप्रमाणे वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी गोव्याहून कोल्हापूरकडे जाणारी एक खाजगी ट्रॅव्हल्स बस तपासणीसाठी थांबविण्यात आली. बसमध्ये चालक दत्तात्रय गुलाब इलापे, अमोल सुभाष कोंढाळकर आणि क्लिनर सचिन इरकर होते.
बसची तपासणी करताना पोलिसांनी डिक्क्या उघडण्यास सांगितले असता क्लिनरने सर्व डिक्क्या उघडून दाखवल्या; मात्र एक डिक्की लॉक असून ती उघडत नसल्याचे सांगितले. यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी संबंधित डिक्की उघडून पाहिली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या दारूचे तीन बॉक्स आढळून आले.
दारूबाबत चौकशी केली असता वाहतुकीसाठी आवश्यक परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. याची माहिती पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांना देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार क्लिनर सचिन इरकर याला दारूसह ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, ट्रॅव्हल्समधील प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बसला पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.
यानंतर इरकर याला वैभववाडी पोलीस ठाण्यात आणून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ)(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत.












