ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाचे कार्य. अभियंता- कणकवली यांना निवेदनाने साकडे !
तारीख १० जुलै पर्यंत वीज समस्यांचा निपटारा न झाल्यास, ग्रामस्थांसह तीव्र आंदोलनाचा इशारा !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : आज फोंडाघाट सरपंच सौ, संजना आग्रे यांच्या नेतृत्वाखाली, शिष्टमंडळाने कणकवली वीज कार्यालयात कार्य. अभियंता यांना निवेदन देऊन, गावची व्यथा मांडली. तारीख १० जुलै पूर्वी, सर्व बाबींची पूर्तता न झाल्यास आणि वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास,ग्रामस्थांसह आंदोलनाचा इशारा दिला.
मात्र यावेळी कार्य.अभियंता नेहमीप्रमाणे कार्यालयीन कामासाठी उपस्थित नव्हते.वीज अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले. यामध्ये फोंडाघाट गावचा विस्तार आणि लोकसंख्या मोठी असल्यामुळे आणि लोकांची वीज खंडित होत असल्याने गैरसोय होत आहे. अपुऱ्या वायरमन मुळे समस्या दूर होण्यास विलंब होतो. कायमस्वरूपी कनिष्ठ अभियंता उपलब्ध व्हावा.आणि गावातील वीज ग्राहकांचा स्मार्ट मीटर बसविण्याला तीव्र विरोध असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी उपसरपंच तन्वी मोदी, मिलिंद लाड, सुभाष सावंत, स्नेहलता पांचाळ, मिलिंद लाड, प्राची धुरी, जयेश भोगले तसेच सोसायटी चेअरमन राजन नानचे इ.शिष्टमंडळात सहभागी झाले होते.
फोंडाघाट मरावीम सध्या दुय्यम अभियंता विना असल्याने वीज ग्राहक वाऱ्यावर असून त्यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दिवसा रस्त्यावरील दिवे सुरू असून रात्रीचे बंद असतात. गावाची नळ पाणी योजना दर तासाला,वीज खंडित होत असल्याने बाधित झाली आहे. दळण- चक्क्या बंद असल्याने महिलांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुळात मार्च ते मे मध्ये करावयाची कामे फांद्या तोडणे,अडथळे हटवणे, ट्रान्सफॉर्मर बदलणे इत्यादी कामे चालू वर्षी झालीच नाहीत.नियोजन शून्य ठेकेदार व स्टाफ कमी असल्याने त्यांचे वर कुणाचाच वचक राहिलेला दिसत नाही. परिसरातील कित्येक लोखंडी पोल (खांब) सडल्यामुळे कधीही अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांबळे- पांढरे गेल्यानंतर आता फोंडाघाट वीज कार्यालयात कोणाची वर्णी लागते आणि कारभार सुधारतो ? याकडे सर्व वीज ग्राहकांचे लक्ष लागले आहे. ग्राहकांचा प्रक्षोभ होण्यापूर्वी यामध्ये गांभीर्याने बदल व्हावा अशी अपेक्षा सर्वसामान्या मध्ये व्यक्त केली जात आहे.













