खारेपाटण (प्रतिनिधी) : महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण प्रशासनात महिलांच्या नेतृत्वाला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या महिला लोकप्रतिनिधींच्या राष्ट्रीय परिषदेत कोकण विभागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायंगणी ग्रामपंचायतीच्या सरपंच अस्मि प्रशांत लाड यांनी सहभाग नोंदवला. देशातील प्रत्येक राज्यातून तसेच राज्यातील प्रत्येक विभागातून केवळ एकाच महिला सरपंच प्रतिनिधीची निवड करण्यात आली होती. या निवडीमध्ये कोकण विभागाचे प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान सौ. लाड यांना मिळाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकण विभागाचा गौरव झाला आहे.
ही राष्ट्रीय परिषद ११ मार्च २०२६ रोजी नवी दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत देशभरातील सुमारे ७०० महिला लोकप्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून आलेल्या महिला सरपंच, पंचायत सदस्य आणि ग्रामविकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला नेत्यांनी या परिषदेत सहभाग घेतला.
परिषदेत महिलांचे नेतृत्व अधिक सक्षम करणे, ग्रामपंचायत प्रशासन अधिक प्रभावी बनवणे तसेच ग्रामीण विकासात महिलांचा सक्रिय सहभाग वाढवणे या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. ग्रामपातळीवरील प्रशासनात महिलांची भूमिका कशी महत्त्वाची आहे आणि महिलांच्या नेतृत्वामुळे गावात सकारात्मक बदल कसे घडू शकतात यावर विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
तसेच या परिषदेत विविध तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या सत्रात महिलांच्या नेतृत्व क्षमतेचा विकास, प्रशासनाशी संवाद, निर्णयक्षमता तसेच ग्रामसभा आणि पंचायत बैठकीत प्रभावी सहभाग यासंबंधी चर्चा करण्यात आली. विविध राज्यांतील महिला पंचायत नेत्यांनी आपल्या गावात राबवलेल्या उपक्रमांचे अनुभवही यावेळी मांडले.तर दुसऱ्या तांत्रिक सत्रात महिलांसाठी अनुकूल ग्रामपंचायत उभारणी, डेटा आधारित विकास, ग्रामीण भागातील सामाजिक परिवर्तन तसेच महिलांच्या नेतृत्वामुळे गावात होणाऱ्या सकारात्मक बदलांवर चर्चा झाली. या सत्रामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी देखील महिलांच्या नेतृत्वाबाबत मार्गदर्शन केले.
या परिषदेत केंद्र सरकारच्या अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. केंद्रीय मंत्रीअनुपमा देवी,राजीव राजन सिंग
आणि रक्षा निखिल खडसे यांनी महिलांच्या नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित केले. ग्रामीण भारताच्या विकासात महिला लोकप्रतिनिधींची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यांचे नेतृत्व अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र शासन विविध उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.या परिषदेत देशातील विविध राज्यांतील उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला पंचायत प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला. महिलांसाठी अनुकूल ग्रामपंचायत उभारणीसंदर्भातील उत्तम कामांचे संकलन असलेल्या पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच ग्रामीण भागात महिलांच्या नेतृत्वातून घडलेल्या परिवर्तनाच्या प्रेरणादायी कथा देखील सादर करण्यात आल्या.
कोकण विभागातून या परिषदेसाठी निवड होणे हे सरपंच अस्मि प्रशांत लाड यांच्या नेतृत्वगुणांचे आणि वायंगणी ग्रामपंचायतीत केलेल्या विकासकामांचे कौतुक मानले जात आहे. ग्रामविकास, महिलांचा सहभाग वाढविणे तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविणे या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांची या परिषदेसाठी निवड करण्यात आली.या परिषदेमुळे देशभरातील महिला लोकप्रतिनिधींना अनुभवांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळाली. विविध राज्यांमधील यशस्वी उपक्रमांची माहिती मिळाल्यामुळे ग्रामीण विकासासाठी नवीन दिशा मिळाल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
वायंगणी सरपंच अस्मि प्रशांत लाड यांच्या या सहभागामुळे वायंगणी गावासह संपूर्ण कोकण विभागाचा सन्मान वाढला असून त्यांच्या या यशाबद्दल स्थानिक स्तरावर अभिनंदन करण्यात येत आहे.












