चौके जि प प्राथमिक शाळेत खाऊ गल्ली उपक्रमाला मोठा प्रतिसाद
चौके (प्रतिनिधी) : पी.एम.श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौके नंबर 1 या शाळेत गुरुवारी सकाळी शालेय मुलांचा ‘खाऊ गल्ली’ हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात शाळेच्या सर्व बाल विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग घेत आठवडा बाजाराप्रमाणे आपली दुकाने थाटली आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणि खाण्यासाठी ठेवले होते.
शाळेच्या या उपक्रमाचा शुभारंभ चौके गावचे सरपंच पी के चौकेकर तसेच ज्येष्ठ ग्रामस्थ सदाशिव गावडे गुरुजी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी उद्योजक बिजेंद्र गावडे, माजी सरपंच सुरेश चौकेकर सचिन आंबेरकर, ज्येष्ठ पत्रकार संतोष गावडे वावळ्याचे भरड मंडळाचे अध्यक्ष दत्ता गावडे माजी सभापती मनीषा वराडकर निवृत्ती शिक्षक विजय चौकेकर ग्रामपंचायत सदस्य जयश्री कदम विशाखा चौकेकर, संघर्ष बचत गट श्रीमती निरा सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन गावडे, उपाध्यक्ष पूर्वा गावडे, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णा चौकेकर आशा स्वयंसेविका सिद्धाली गावडे, प्राथमिक शाळा मुख्याध्यापक भाग्यश्री कुनुरे मॅडम, मनीषा डाके मॅडम तसेच पालक ग्रामस्थ उपस्थित होते.
खाऊ गल्ली या उपक्रमात शालेय मुलांनी उकडीचे मोदक, इडली, डोसा चटणी, आप्पे चटणी, घावणे, थालीपीठ, दही साबुवडे, स्वीटकॉर्न, व्हेज मोमोज, शेवयाची खीर, बीट रूट बर्फी, पोहे, चहा, कोकमसरबत, शेंगदाणा चिक्की,खोबऱ्याची बर्फी,गुलाबजामून,गोबी मंचुरियन,ओले काजू,कुळीथ पीठ,नारळ,अंडी,जाम,शेवग्याच्या शेंगा, कोबी, सुरण, पालेभाज्या शाळेच्या आवारात विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. यावेळी चौके गावातील ग्रामस्थांनी शाळेतील मुलांनी आणलेल्या खाऊची मनसोक्त खरेदी केली. यामुळे बालवयातच मुलांना व्यापार कसा करावा याचा धडा मिळाला. शाळेतील लहान मुलांनी भरवलेला खाऊ गल्ली चा बाजार सर्वांना आनंद देऊन गेला.
खाऊ गल्ली हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक शाळेतील शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती, माता पालक संघ व पालकांनी मेहनत घेतली.












