शिक्षणासोबत संस्कारांची शिदोरी देणे ही काळाची गरज

पराड जिल्हा परिषद शाळा शतक महोत्सव सोहळ्यात दत्ता सामंत यांचे प्रतिपादन

चौके (प्रतिनिधी) : पराड हा कर्ली नदीचा काठावर वसलेला एक उपक्रमशील आणि नेहमी एकोप्याने नांदत असलेला गाव आहे. आज गावातील प्राथमिक शाळेचा होत असलेला शतक महोत्सव सोहळा हा ज्ञान मंदिराचा खरा उत्सव सोहळा आहे आणि या ज्ञान मंदिराच्या सोहळ्याचे आम्ही साक्षीदार झालो हे आमचे भाग्य असल्याचे मी समजतो. शिक्षणासोबत संस्काराची शिदोरी देणे ही देखील काळाची गरज आहे, असे प्रतिपादन उद्योजक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मालवण तालुक्यातील (पेंडूर) पराड येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शतक महोत्सव कार्यक्रमात बोलताना केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील (पेंडूर) पराड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शतक महोत्सव सोहळा दिमाखात पार पडला. यानिमित्ताने ८ मार्च ते १० मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी कार्यक्रमाला उपस्थिती लावून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी केक कापून व शाळेच्या शतक महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन करून शतक महोत्सव साजरा करण्यात आला. तसेच सन १९६४ साली आदम शेख महम्मद व मोहम्मद शेख हुसेन व शेख परिवार पराड यांनी शाळेला विनामोबदला जमीन देण्यात आलेल्या कायमस्वरूपी दगडी पाटीचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमा दरम्यान ग्रामस्थांनी श्रमदान करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाप्रमुख दत्ता सामंत बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य संतोष साठविलकर, मालवण पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, पेंडूर सोसायटी चेअरमन दीपा सावंत, सरपंच नेहा परब, मुंबई मंडळ अध्यक्ष आबा पाटकर, शतक महोत्सव समिती अध्यक्ष प्रदीप आवळेगावकर, श्रावणी नाईक, आनंदव्हाळ सरपंच रश्मी टेंबुलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपलक्ष्मी पराडकर, ग्रा. प. सदस्य विवेक जबडे, अंकिता सावंत, वैष्णवी लाड, गटशिक्षणाधिकारी संजय माने, केंद्रप्रमुख नंदकिशोर गोसावी, रंगनाथ आजगावकर, आतीक शेख, सलीम शेख, श्यामकांत आवळेगावकर, शेखर फोंडेकर, सागर माळवदे, तंटामुक्त समिती अध्यक्ष बिपीन परब, पोलिस पाटील विश्वास मालवणकर, ग्रामसेविका शुभदा कोठावळे, मुख्याध्यापक कृष्णा कालकुंद्रीकर, सहशिक्षक शीतल पाटील, महेश नाईक, रावजी चव्हाण व अन्य मान्यवर गावातील प्रमुख मंडळी, ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना दत्ता सामंत म्हणाले की पराड गावातील मंडळींनी व शिक्षकांनी आजच्या कार्यक्रमातून शिक्षणासोबत संस्काराचे दर्शन घडवून दिले. आजच्या कार्यक्रमातून शिक्षकांनी खरा आदर्श समोर ठेवला आहे. तो आत्मसात करणे गरजेचे आहे. उत्साही व्यक्ती म्हणून पेंडूर गावचे सुपुत्र शिक्षक संजय नाईक सरांची ओळख होती. शैक्षणिक क्षेत्रात नाईक सरांचे फार मोठे योगदान आहे. या कार्यक्रमातून आज नाईक सरांची आठवण आली. मात्र गावात आल्यावर नेहमी त्यांची उणीव भासते. असे सांगत नाईक सरांच्या आठवणींना उजाळा दिला.

विकास कामांची काळजी सोडा
मालवण कुडाळ मतदार संघाला कार्यतत्पर आमदार तुमच्या आशीर्वादाने लाभले आहेत. त्यामुळे विकासकामांची काळजी सोडाच तुमच्या गावातील कोणतीच विकास कामे शिल्लक राहणार नाहीत. कारण स्वतः नारायण राणे खासदार तर नितेश राणे पालकमंत्री आहेत आणि सर्व सत्ता केंद्र आपल्या ताब्यात आहेत. त्यामुळे विकासकामे पूर्ण करणारच अशी ग्वाही दिली.

जिल्हा परिषद सदस्य संतोष साठविलकर बोलताना म्हणाले की माझ्या मतदार संघातील ज्ञानमंदिराचा शतक महोत्सवी सोहळा आणि या सर्व सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार हा खरोखरच माझ्यासाठी दुग्धशर्करा योग आहे. आमचे भाग्य की यानिमित्ताने शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. खरा उत्साह आज पराड गाववासियांच्या चेहऱ्यावर दिसतो. आजच्या कार्यक्रमामुळे तुमचा आनंद द्विगुणित झाला. ८ मार्च रोजी या कार्यक्रमाला सुरुवात करून जागतिक महिला दिनाची जोड दिली ही सुंदर संकल्पना जपली. पराड हे श्रमिक गाव असून गावात पुस्तकी ज्ञान देताना स्वावलंबनाचे धडे दिले जातात. राजकीय कार्यक्रम करताना असे कार्यक्रम मिळणे हे आमचे भाग्य आहे, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्या. कृष्णा कालकुंद्रीकर, सूत्रसंचालन राजा सामंत तर आभार प्रदीप आवळेगावकर यांनी मानले.

error: Content is protected !!